गोवा सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच मला राज्यपालपदावरून हटवण्यात आले !

गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा आरोप

सध्याचे मेघालयचे राज्यपाल आणि पूर्वी गोव्याचे राज्यपालपद भूषवलेले सत्यपाल मलिक आणि ‘टीव्ही टुडे’चे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई (सौजन्य : The lallanTop)

नवी देहली – गोव्यातील भाजप सरकार कोरोना महामारीशी योग्य पद्धतीने दोन हात करण्यात अयशस्वी ठरले, या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. गोवा सरकारने जे काही केले त्यात भ्रष्टाचार होता. सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच मला राज्यपालपदावरून हटवण्यात आले, असा आरोप सध्याचे मेघालयचे राज्यपाल आणि पूर्वी गोव्याचे राज्यपालपद भूषवलेले सत्यपाल मलिक यांनी केला आहे. ‘या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत: लक्ष घालावे’, अशी सूचनाही मलिक यांनी केली आहे. ‘टीव्ही टुडे’चे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या एका मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी हे विधान केले आहे. मलिक नोव्हेंबर २०१९ ते १८ ऑगस्ट २०२० पर्यंत गोव्याच्या राज्यपालपदी होते.

सत्यपाल मलिक म्हणाले की,

१. घरोघरी शिधावाटप करण्याची गोवा सरकारची योजना अव्यवहारिक होती. सरकारला पैसे चारणार्‍या एका आस्थापनाच्या सांगण्यावरून हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेससहित अनेक पक्षांनी माझ्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. मी या प्रकरणाची चौकशी केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याची माहिती दिली.

२. सध्याचे राजभवन पाडून नवे भवन उभारण्याचा गोवा सरकारचा मानस होता. खरेतर याची काहीएक आवश्यकता नव्हती. सरकार आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतांनाही त्याने हा प्रस्ताव मांडला होता.