कोकणातील काजू उत्पादकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार

‘व्याजदर सवलत योजना’ राबवण्याचा शासनाचा निर्णय

काजू उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई – कोकणच्या शाश्‍वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसाय यांसह पर्यटन वाढीसाठी राज्यसरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचसमवेत कोकणातील काजू उत्पादकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज (भांडवल) उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून ‘व्याजदर सवलत योजना’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात काजू उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला कृषीमंत्री दादाजी भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री कु. अदिती तटकरे, आमदार शेखर निकम उपस्थित होते.
या वेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘व्याजदर सवलत योजना’ सिद्ध करण्यात येत आहे, तसेच ओल्या काजूगराला अधिक किंमत मिळत असल्याने प्रायोगिक तत्त्वावर ओला काजूगर काढण्याची यंत्रसामुग्री लुधियानावरून मागवण्यात येणार आहे. या यंत्रांमुळे ओल्या काजूगराचे उत्पादन वाढण्यास साहाय्य होणार आहे.’’

अधिक उत्पन्न देणारे काजूचे वाण विकसित करण्याच्या सूचना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी दिल्या.
या बैठकीला नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, राज्य उत्पादन विभागाच्या प्रधान सचिवा वल्सा नायर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.