‘साधकांची हाक ऐकताच सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव तेथे येतात’, याविषयी साधकांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सौम्या कुदरवळ्ळी, त्यांचा ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा मुलगा कु. नंदन (वय ७ वर्षे) आणि त्यांची बहीण सौ. संगीता चौधरी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासंदर्भात आलेली अनुभूती येथे देत आहोत.

कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी

१. कु. नंदन परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्यासाठी आतुर होणे आणि त्याला समजावूनही त्याचे समाधान न होणे

‘९.४.२०२० या रात्री ११ वाजता मी खोलीत आले. त्या वेळी माझा मुलगा नंदन माझ्या ताईला (सौ. संगीता चौधरी हिला) बरेच प्रश्न विचारत होता. तो म्हणाला, ‘‘देव प्रत्यक्ष का दिसत नाही ? अश्वत्थामा अतिशय दुष्ट (वाईट) माणूस होता, तरी त्याला कृष्णाचे दर्शन झाले. मी तर भगवंताचा भक्त आहे, तरी मला तो का दिसत नाही ? परात्पर गुरु डॉ. आठवले देव आहेत, तर त्यांच्या हातात शस्त्र का नाही ? ते आपल्या खोलीत का येत नाहीत ? मला आता त्यांच्याजवळ जायचे आहे. मला त्यांना भेटायचे आहे. आपली खोली त्यांच्या खोलीच्या जवळ का नाही ? त्यांच्या आगाशीत त्यांनी मला जागा दिली, तरी चालेल.’’ मी आणि ताई त्याला समजावून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न करत होतो; पण त्याचे समाधान होत नव्हते. तो परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्यासाठी आतुर झाला होता. त्यामुळे तो पुनःपुन्हा ‘परात्पर गुरुदेव आपल्या खोलीत का येत नाहीत ? ते मला का दिसत नाहीत ? मला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे’, असे म्हणत होता.

२. आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

२ अ. ‘परात्पर गुरुदेव खोलीत आले आहेत आणि ते स्वतःच्या माध्यमातून कु. नंदनशी बोलत आहेत’, असे नंदनच्या आईला जाणवणे : त्याच क्षणी ‘पांढरी बंडी घालून परात्पर गुरुदेव आमच्या खोलीत येत आहेत’, असे मला जाणवले. त्यानंतर पुढच्या क्षणी वातावरण शांत झाले. त्या वेळी एक क्षण माझे अस्तित्व शून्य होऊन मी परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व अनुभवले. ‘माझे डोळे परात्पर गुरुदेवांचे डोळे आहेत. ते माझ्या माध्यमातून नंदनशी बोलत आहेत’, असे मला वाटले.

सौ. सौम्या कुदरवळ्ळी

२ आ. स्वतःच्या माध्यमातून परात्पर गुरुदेव कु. नंदनशी बोलत असल्याचे जाणवणे आणि त्यानंतर तो शांत होणे : नंदनने मला पुन्हा ‘परात्पर गुरुदेव मला दर्शन का देत नाहीत ?’, असे विचारले. तेव्हा मी (माझ्यातील परात्पर गुरुदेव) ‘मीच परात्पर गुरु डॉक्टर आहे’, असे म्हणणार होते; परंतु असे न म्हणता ‘तू मला पत्र लिहिले आहेस ना ? त्याचा निरोप देण्यासाठी मी आलो आहे’, असे म्हटले. तेव्हा नंदन शांत झाला.

२ इ. बहिणीलाही ‘परात्पर गुरुदेव खोलीत आले आहेत आणि ते साधिकेच्या माध्यमातून बोलणार’, असे जाणवणे : मी ताईला विचारले, ‘‘२ मिनिटांपूर्वी तुला काही जाणवले का ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘२ – ३ मिनिटांपूर्वी मला पांढरा सदरा घातलेले परात्पर गुरुदेव आपल्या खोलीत येतांना दिसले आणि ‘ते तुझ्या माध्यमातून बोलणार आहेत’, असे वाटले.’’ तेव्हा माझ्या अंगावर रोमांच आले. ती पुढे म्हणाली, ‘‘मी परात्पर गुरु डॉक्टर आहे’, असे तू बोलणार’, असे मला वाटले.’’ हे बोलणे झाल्यावर आम्हा दोघींची भावजागृती झाली.

२ ई. नंदनला विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘मला तुझ्यासमोर मोरपीस फिरतांना दिसले. तुझे अनाहतचक्र आणि आज्ञाचक्र यांवर निळा प्रकाश दिसला.’’

२ उ. कु. नंदनमध्ये परात्पर गुरुदेवांना भेटण्याची तीव्र तळमळ निर्माण झाल्याने ‘परात्पर गुरुदेव त्याला भेटण्यासाठी धावत आले’, असे वाटणे : त्या वेळी मला परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. नंदनमध्ये परात्पर गुरुदेवांना भेटण्याची तीव्र तळमळ निर्माण झाली आणि तो लहान असूनही ‘परात्पर गुरुदेव त्याला भेटण्यासाठी धावत आले’, असे मला वाटले. ‘साधकांची एक हाक ऐकताच परात्पर गुरुदेव कसे धावून येतात ?’, हे मला अनुभवायला मिळाले.

सौ. संगीता चौधरी

३. भावप्रयोगाच्या वेळी नंदनला आईमध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि मावशीमध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ दिसणे

या प्रसंगानंतर नंदन म्हणाला, ‘‘आपण भावप्रयोग करूया.’’ त्यानंतर आम्ही ‘प्रत्यक्ष श्रीकृष्ण आम्हाला भेटण्यासाठी आला आहे’, असा भावप्रयोग केला. भावप्रयोग झाल्यानंतर नंदनने सांगितले, ‘‘आई, मला तुझ्यामध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू आणि मावशीमध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ दिसल्या.’’

३ अ. भावप्रयोगाच्या वेळी माझ्या बहिणीला पुष्कळ त्रास झाला. तिला परात्पर गुरुदेवांचे विकृत रूप दिसले आणि वातावरणात भयानकता जाणवली.

४. वरील दोन्ही प्रसंगांतून मला शिकायला मिळाले, ‘परात्पर गुरुदेवांचे खोलीत आगमन झाले, तरी अनिष्ट शक्ती त्रास देण्यासाठी तेव्हा येतात. आम्हाला त्यांच्या अस्तित्वाचा आनंद घेता येऊ नये; म्हणून त्या प्रयत्न करत असतात.’

– सौ. सौम्या कुदरवळ्ळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.४.२०२०)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.