|
हिंदूंच्या धर्माचा अवमान होणार्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने कुणी अशा प्रकारचे कृत्य करत असेल, तर त्याचाही आता विचार होणे आवश्यक आहे. बांगलादेशमध्ये कथितरित्या कुराणाचा अवमान केल्यावरून गेले काही दिवस हिंदूंविषयी जे काही घडले, तसले प्रकार हिंदू त्यांच्या धर्माचा अवमान झाल्यावर कधीही करत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक
भोपाळ (मध्यप्रदेश) – चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘आश्रम-३’ या वेब सिरीजच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या वेळी प्रकाश झा यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली, तसेच कर्मचार्यांना चोपण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या वेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते अभिनेते बॉबी देओल यांना शोधत होते, असेही सांगण्यात येत आहे. या वेळी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यासह ‘प्रकाश झा मुर्दाबाद’, ‘बॉबी देओल मुर्दाबाद’, अशा घोषणाही देण्यात आल्या. ‘आश्रम – १’ आणि ‘आश्रम – २’ या वेब सिरीज बनवण्यात आल्यानंतर आता प्रकाश झा ‘आश्रम – ३’ बनवत आहेत.
Vandalism on ‘Aashram’ sets in Bhopal over content; Prakash Jha attacked with inkhttps://t.co/03lAl7Jdpe
— R.Glitz (@republic_glitz) October 25, 2021
बॉबी देओल यांचा सहभाग असलेल्या दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेब सिरीजमध्ये हिंदुत्वाचा अवमान करण्यात आला आहे. ‘जोपर्यंत या सिरीजचे नाव पालटले जात नाही, तोपर्यंत या सिरीजचे प्रसारण होऊ देणार नाही. आश्रमाच्या माध्यमातून भोंदू गुरू आणि बाबा हे महिलांचे शोषण करत असल्याची दृश्ये प्रकाश झा यांनी त्यांच्या वेब सिरीजमध्ये दाखवली आहेत. चर्च आणि मदरसे यांच्या संदर्भात असे चित्रीकरण करण्याचे त्यांचे धाडस आहे का ? असा प्रश्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच ‘बॉबी देओल यांनी त्यांच्या भावाकडून (अभिनेते सनी देओल यांच्याकडून) काहीतरी शिकावे आणि देशभक्ती दर्शवणारे चित्रपट बनवावेत’, असा सल्लाही बजरंग दलाने दिला आहे.