सध्या प्रसिद्धीमाध्यमांतून आर्यन खान हा विषय अत्यंत चवीने चघळला जात आहे. आर्यन खानला अटक झाल्यापासून त्याला कारागृहातील जेवण कसे चालत नाही ते त्याचे आई-वडील कसे दु:खी आहेत आणि त्याची अमेरिकेतील बहीण किती दु:खी आहे, हेच दाखवण्यात येत आहे. शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याच्या बाहेर उभे राहून अनेक तरुण कशी छायाचित्र काढत आहेत, अनेक अभिनेते कशा प्रकारे आर्यनला पाठिंबा देत आहेत, अशा प्रकारे शाहरुख आणि आर्यन यांचे उदात्तीकरण करण्याचाच प्रयत्न प्रसिद्धीमाध्यमे करत आहेत. वस्तूत: अमली पदार्थ प्रकरणात अटकेत असणारा आणि ज्याचे धागे-दोरे आंतराष्ट्रीय रॅकेटपर्यंत जातात, त्या प्रकरणाचे वृत्तांकन कसे करायला हवे, याचे भानही प्रसिद्धीमाध्यमांना नाही, असेच म्हणावे लागेल.
अशा पत्रकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा बिहारमधील एक पत्रकार पुढे आला आहे. त्याने अत्यंत धाडसाने एका ‘व्हिडिओ’च्या माध्यमातून सत्यस्थिती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आजचे तरुण सैनिकांचा आदर्श घेण्याऐवजी अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या युवकाच्या घराबाहेर उभे राहून ‘सेल्फी’ (स्वतःच स्वतःचे छायाचित्रे काढणे) काढत आहेत आणि ते कसे अयोग्य आहे, याचे सविस्तर वृत्तांकन करून ते जनतेसमोर मांडले. देशातील एकाही वृत्तवाहिनीला युवकांच्या या अयोग्य कृतीविषयी वृत्ताच्या माध्यमातून खडसवावेसे वाटत नाही, हे आश्चर्यकारकच !
याच पत्रकाराने आणखी एका ‘व्हिडिओ’च्या माध्यमातून धक्कादायक वस्तूस्थिती समोर आणली आहे. अमली पदार्थविरोधी पथकाच्या ज्या कार्यालयात आर्यन खानला ठेवले होते, त्याच कार्यालयासमोर एका ‘वेब सिरीज’चे चित्रीकरण चालू होते. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी कर्मचार्यांनी कुणालाही न विचारता एक रस्ताही बंद केला होता. या प्रकरणी या पत्रकाराने जाब विचारल्यावर ‘वेब सिरीज’च्या कर्मचार्यांनी त्या पत्रकारालाच त्याचा ‘व्हिडिओ’ पुसण्याची धमकी दिली. हे सर्व खरे पोलीस आणि प्रसिद्धीमाध्यमे यांच्यासमोर चालू असतांना एकानेही त्यावर आक्षेप घेतला नाही. या पत्रकाराने ही ‘वेब सिरीज’ कशा प्रकारे लोकांची दिशाभूल करत आहे, हे मांडताक्षणी सर्वांनी काढता पाय घेतला. त्यामुळे यातून समाजाला गुन्हेगारी, अमली पदार्थांच्या कह्यात गेलेल्यांचे उदात्तीकरण करणार्या नाही, तर या सर्वांचे लागेबांधे उघड करणार्या सत्यान्वेषी पत्रकारितेची आवश्यकता आहे ! बिहारमधील पत्रकाराचे प्रयत्न कौतुकास्पद म्हणावे लागतील !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर