‘सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन’च्या पदाधिकार्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !
मुंबई – कोरोनामुळे राज्यात बंद असलेली चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत २२ ऑक्टोबरपासून चालू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. नाट्य कलावंतांसाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. चित्रपटगृहे चालू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन’च्या पदाधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, तसेच स्थापत्यविषयीच्या सुरक्षा चाचण्या करून मगच चित्रपटगृहे चालू करावीत. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना दिलासा कसा देता येईल ?, यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल.
विविध परवान्यांच्या नूतनीकरणासाठी राज्यशासनाने सवलत द्यावी, चित्रपट अनुज्ञप्तीचे विनामूल्य नूतनीकरण करून द्यावे, जी.एस्.टी. भरल्यानंतर प्रत्येक तिकिटामागे २५ रुपये ‘सर्व्हिस चार्जेस’ आकारण्यास अनुमती द्यावी, विद्युत् वापर नसल्याने देयके किमान वापरावर आधारित असू नयेत, मिळकत कर आकारू नये, अशा विविध मागण्या या वेळी ‘असोसिएशन’च्या वतीने करण्यात आल्या.
चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे यांच्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना घोषित केल्या आहेत. त्यानुसार दोन प्रेक्षकांमध्ये एका आसंदीचे अंतर ठेवावे, चित्रपटगृहांतील मोकळ्या जागांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. चित्रपटगृहांमध्ये येणार्या प्रेक्षकांना मुखपट्टी (मास्क) बंधनकारक आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे ५० टक्के आसनक्षमतेसह चालू करण्यास अनुमती असेल.