वाहतूक पोलिसांनी दंड भरायला सांगितल्याने चालकाने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली !

वाहतूक पोलिसाला मारहाण करणे, गाडीवरून फरफटत नेणे इत्यादी घटना काही दिवसांनी घडत आहेत. संबंधितांना कठोर शिक्षा होत नसल्याने पोलिसांचा धाक राहिलेला नाही. या उन्मत्त अभियंत्याचा वाहन परवाना रहित करून त्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल. – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – चारचाकी वाहनावर असलेला जुना ४०० रुपयांचा दंड ऑनलाईन भरण्यास  सांगितल्याने वाहतूक पोलीस हवालदाराला अभियंत्याने ८०० मीटर फरफटत नेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मुंढवा सिग्नल चौक – खराडी बायपास रस्ता, साईनाथनगर ते झेंसार कंपनी फाटा येथे हा प्रकार घडला. स्थानिक नागरिक आणि इतर पोलीस यांनी चारचाकी गाडीचा पाठलाग करून वाहतूक पोलीस कर्मचार्‍याची सुटका केली. अभियंता प्रशांत कांतावर यांना मुंढवा पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार शेषराव जायभाय यांनी तक्रार दिली आहे. जायभाय यांनी कांतावर यांना दंडाची रक्कम भरण्यास सांगितल्याने ‘तुम्ही पोलीस केवळ पैसेच वसूल करता, तुम्हाला दुसरी कामे नाहीत का ?’ असे अरेरावीने बोलून कार घेऊन निघून जाण्याचा प्रयत्न केला. झालेल्या प्रकारामुळे जायभाय गाडीवर पडले. आधारासाठी त्यांनी गाडीच्या वायपरला (गाडीची  काच स्वच्छ करण्यासाठीचा रबरी दांडा) पकडल्याने त्यांच्या हाताला खरचटले.