भ्रमणभाष संच (मोबाईल) पहाण्यात अधिक वेळ व्यतित केल्यामुळे डोक्यामध्ये ‘नवीन’ गाठीची निर्मिती होणे !

‘शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या लोक एवढा वेळ ‘स्मार्टफोन’ (भ्रमणभाष संच) आणि ‘टॅबलेट’वर (हाताच्या तळव्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे भ्रमणसंगणक) व्यतीत करत आहेत की, त्यांच्या डोक्याच्या मागील हाडावर गाठ निर्माण होऊ लागली आहे. ऑस्ट्रेलियामधील ‘सनशाईन कॉस्ट विश्वविद्यालया’तील’ संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार अशा लोकांची संख्या वाढत आहे. या हाडाच्या गाठीला ‘ऑक्सिपिटल प्रोटुबर्न्स’ (occipital protuberance) असे म्हणतात, जो आजार युवकांमध्ये वेगाने पसरत आहे. १८ ते ३० वर्षांच्या युवकांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. २८ वर्षे वयाच्या युवकामध्ये ही गाठ २७.८ एम्.एम्. आकाराची आढळली, तर ५८ वर्षे वयाच्या व्यक्तीमध्ये २४.५ एम्.एम्.आकाराची आढळली. संशोधकांनी या अभ्यासासाठी १८ ते ८६ वर्षें वयाच्या एक सहस्रपेक्षा अधिक लोकांच्या डोक्यांचे ‘स्कॅन’ केले आहे.

उपकरणे हाताळल्याने शरिराच्या भागावर ताण येणे

संशोधन पथकाचे नेतृत्व करणारे डॉ. डेव्हिड म्हणतात, ‘मला रुग्णांवर उपचार करण्याचा २० वर्षांचा अनुभव आहे; परंतु मागील एक दशकात मला समजले की, माझ्या रुग्णांच्या डोक्याच्या कवटीच्या हाडामध्ये गाठ निर्माण होत आहे. आधुनिक वैद्यांच्या म्हणण्यानुसार ‘गॅझेट’ (दैनंदिन जीवनात उपयुक्त असलेले उपकरण) हाताळण्यात घंटो न् घंटे शरिराचा वापर होत असलेल्या भागावर एवढा ताण येतो की, मानवाचे अस्थिपंजर (हाडांचा सापळा) होण्याएवढा पालट होतो.’

लोक प्रत्येक १२ मिनिटाला भ्रमणभाष पहातात !

ब्रिटनमध्ये प्रत्येक व्यक्ती सरासरी प्रति सप्ताह २४ घंटे ‘स्मार्टफोन’ हाताळण्यात घालवतात. सर्वसाधारण लोक सरासरी प्रत्येक १२ मिनिटाला आपला भ्रमणभाष संच पहातात.

पाठीच्या कण्याच्या हाडांवर ताण वाढणे

एका अन्य संशोधनानुसार जे युवक ‘गॅझेट’चा वापर दीर्घकाळ करतात आणि दीर्घकाळ एकाच स्थितीत बसून काम करतात, त्यांच्यामध्ये पुनःपुन्हा होणार्‍या आघातामुळे होणार्‍या जखमेची (‘रिपिटिटिव्ह इन्ज्युरी’ची) शक्यता वाढते. लोक दूरचा प्रवास करून किंवा दीर्घकाळ चारचाकी चालवून कार्यालयात पोचतात. बरेचसे युवक अधिकांश वेळ एकाच जागी बसून काम करत रहातात. संगणकावर काम करतात, घरातसुद्धा भ्रमणभाषवर सामाजिक माध्यमांवर (‘सोशल मीडिया’वर) व्यस्त रहातात. गॅझेटवर एवढा दीर्घकाळ वेळ घालवल्यामुळे पाठीच्या कण्याच्या हाडांवरील ताण वाढतो.’

– (साभार : मासिक ‘अक्षर प्रभात’, सप्टेंबर २०१९)