जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद गिलानी यांच्या नातवाला सरकारी नोकरीतून काढले !

आतंकवादी कारवायांना साहाय्य केल्याचा आरोप

  • एकीकडे काश्मीरमध्ये सैन्य आतंकवाद्यांशी अहोरात्र लढत असतांना दुसरीकडे काश्मीरमधील प्रशासनात इतकी वर्षे आतंकवाद्यांचे पाठीराखे कार्यरत असणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक
  • हे इतकी वर्षे गुप्तचर यंत्रणांना समजले कसे नाही ? – संपादक
डावीकडून अनीस-उल्-इस्लाम आणि सय्यद अली शाह गिलानी

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – आतंकवादी कारवायांना साहाय्य केल्याच्या आरोपावरून जम्मू-काश्मीर प्रशासनाने फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे नातू अनीस-उल्-इस्लाम यांना सरकारी सेवेतून काढून टाकले. राज्यघटनेच्या अनुच्छेद ३११ अंतर्गत विशेष तरतुदींचा वापर करून ही कारवाई करण्यात आली. ‘सय्यद गिलानी यांनी त्यांच्या नातवाला सरकारी नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हिंसाचार केला होता. वर्ष २०१६ मध्ये त्यांच्या नातवाच्या नियुक्तीनंतर लगेच परिस्थिती शांत झाली होती’, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

सरकारी सेवेत नियुक्ती होण्याच्या काही मासांपूर्वी अनीस पाकिस्तानला जाऊन आला होता. सय्यद गिलानी यांच्या सांगण्यावरून तिथे आय.एस्.आय.चे कर्नल यासीर यांना अनीस भेटला होता, तसेच सरकारी नोकरीत नियुक्ती होण्यापूर्वी अनीस श्रीनगर आणि त्याच्या आसपास कायदा आणि सुव्यवस्थेच्या घटना अन् इतर घटनांचे व्हिडिओ बनवण्यासाठी ‘ड्रोन’ उडवण्याची सोय करत होता आणि त्याद्वारे केलेले चित्रीकरण आय.एस्.आय.कडे पाठवत होता. अनीस संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया येथील ३ संशयित आतंकवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्याचेही सूत्रांनी सांगितले.