अशी मागणी का करावी लागते ? झोपडपट्टीतील नागरिकांची सोय शाळा चालू होण्यापूर्वी सरकारने का केली नाही ? – संपादक
पुणे, १५ ऑक्टोबर – राज्य सरकारच्या निर्णयाने ४ ऑक्टोबरपासून शाळा चालू करण्यात आल्या आहेत; परंतु गंज पेठेतील (६ नंबर कॉलनी) येथील आचार्य विनोबा भावे शाळेमध्ये झोपडपट्टीतील नागरिक रहात असल्यामुळे पालकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांना तेथून हलवावे, अशी मागणी शाळा समितीने निवेदनाद्वारे महापालिका शिक्षण मंडळासह नगरसेवकांकडे केली आहे.
या शाळेत दीड वर्षापूर्वी टिंबर मार्केटमधील (लाकूड वसाहत) एका इलेक्ट्रिकच्या साठवणूकगृहाला (गोडावून) लागलेल्या आगीत शेजारील १० झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. त्या कुटुंबांना उपमहापौरांनी या शाळेत तात्पुरती रहाण्याची व्यवस्था केली होती; परंतु कटुंबियांना पर्यायी व्यवस्था नसल्याने ते आजही शाळेतच रहात आहेत.
‘घरे बांधून देऊ’, अशी आश्वासने देऊनही अद्याप कुणीही आले नसल्याने आम्ही अजूनही शाळेतच रहात आहे, असे झोपडपट्टीतील नागरिकांचे म्हणणे आहे, तर घरांची दुरुस्ती झाल्यास लवकरात लवकर त्यांचे स्थलांतर करण्यात येईल, असे महापालिका गवणी विभागातील उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी सांगितले.