अधिवक्ताच गुन्हेगार असतील, तर समाजाने कुणाचा आदर्श घ्यायचा ? अशा अधिवक्त्यांना लवकर कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.
पुणे – अनेक नामवंतांना धमकावून त्यांची फसवणूक करणार्या आणि पुणे जिल्हा न्यायालयाकडून फरार घोषित केलेले अधिवक्ता सागर सूर्यवंशी यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कह्यात घेतले. सूर्यवंशी यांच्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिवाजीनगर, पिंपरी, भोसरी औद्योगिक वसाहत (एम्.आय.डी.सी.) अन् नवघर पोलीस ठाण्यात मिळून ११ गुन्हे नोंद आहेत. गेल्या ३ वर्षांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते.
सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. पोलिसांकडे उपस्थित रहाण्याचा आदेश दिल्यानंतरही ते उपस्थित न राहिल्याने त्यांना फरार घोषित केले होते. शुक्रवार पेठेतील रेणुका माता मंदिरात सूर्यवंशी येणार असल्याची माहिती मिळाल्याने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून त्यांना कह्यात घेतले. पहाटे छातीत दुखत असल्याचे सांगितल्याने सूर्यवंशी यांना ससून रुग्णालयात भरती केले आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे पथक पुढील अन्वेषण करत आहेत.