वैभववाडी येथे ए.टी.एम्. मध्ये भरण्यासाठी आणलेले २३ लाख रुपये लुटण्याचा डाव आस्थापनाच्या कर्मचार्‍यांनीच रचल्याचे उघड !

वैभववाडी पोलिसांनी २४ घंट्यांत उघड केली चोरी !

प्रातिनिधिक छायाचित्र

वैभववाडी – बँक ऑफ इंडियाच्या येथील ‘ए.टी.एम्.’मध्ये रक्कम भरण्यासाठी येत असलेल्या ‘सेक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड’ या आस्थापनाच्या कर्मचार्‍यांना तळेरे-वैभववाडी मार्गावर अज्ञात चोरांनी २३ लाख रुपयांना लुटण्यात आल्याची घटना १२ ऑक्टोबरला घडली होती; मात्र पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात उपरोक्त आस्थापनाच्या २ कर्मचार्‍यांनीच हा डाव रचल्याचे उघड झाले आहे.

बँक ऑफ इंडियाच्या कणकवली येथील शाखेतून उपरोक्त आस्थापनाचे कर्मचारी विठ्ठल खरात आणि संदेश कारिवडेकर यांनी ३० लाख रुपयांची रोख रक्कम घेतली. त्यातील ७ लाख रुपये बँक ऑफ इंडियाच्या कणकवली शाखेच्या ए.टी.एम्.मध्ये भरले. उर्वरित २३ लाख रुपये घेऊन ते दुचाकीने बँक ऑफ इंडियाच्या वैभववाडी येथील ए.टी.एम्.मध्ये जात होते. त्या वेळी तळेरे-वैभववाडी मार्गावर कोकीसरे, घंगाळेवाडी येथे मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी खरात यांच्या दुचाकीवर लाथ मारली. त्यामुळे खरात यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. या संधीचा लाभ उठवत अज्ञात चोर त्यांच्याकडील २३ लाख रुपये घेऊन पसार झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेनंतर खरात आणि  कारिवडेकर या कर्मचार्‍यांना पोलिसांनी कह्यात घेतले. त्यानंतर कर्मचार्‍यांना घटनास्थळी नेऊन चोरीचा प्रकार कसा घडला, हे समजून घेतले, तसेच अनेक प्रश्नही विचारले. त्या वेळी पोलिसांना या २ कर्मचार्‍यांनीच हा डाव रचल्याचा संशय आला. त्यामुळे दोघांनाही पोलीस ठाण्यात आणून पुन्हा पोलिसांच्या पद्धतीने चौकशी केल्यावर त्यांनी स्वत:च गुन्हा केल्याचे मान्य केले, तसेच या घटनेत अन्य काहींचा समावेश असल्याचे पोलिसांना सागितले. त्यामुळे पोलीस आता अन्य गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.