शासनकर्त्यांनी शिवछत्रपतींच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणे अत्यावश्यक ! – पू. भिडेगुरुजी

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

सांगली, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – सध्याच्या शासनकर्त्यांमध्ये देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, स्वाभिमान यांचा अभाव असल्याने सर्व समस्या निर्माण झाल्या आहेत. जो विचार, जी चेतना या देशाला प्राण देऊ शकते, नवचैतन्य देऊ शकते, ती म्हणजे ‘छत्रपती शिवाजी-संभाजी’ ! ही भारताची संजीवनी आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीत पालट करण्यासाठी शासनकर्त्यांनी शिवछत्रपतींच्या जीवनचरित्राचा ध्यास घेऊन त्याचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरासमोर दसर्‍याच्या दिवशी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले,

१. भारताची लोकसंख्या जगात दोन क्रमांकाची आहे. असे असूनही आपण स्वाभिमान, स्वत्व हरपल्यासारखे रहात आहोत.

२. ‘यथा राजा, तथा प्रजा’ आणि ‘यथा प्रजा, तथा राजा’, अशी स्थिती असून उदात्त, पवित्र अंत:करणाने राज्य करणारा शासनकर्ता आपल्याला मिळत नाही, हे आपले दुर्दैव आहे. सध्याच्या शासनकर्त्यांची बुद्धी विकारवश झाली आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेण्यास ते असमर्थ आहेत.

३. देशाची नवरात्र म्हणजे श्री दुर्गामाता दौड आहे.

४. देश टिकवायचा असेल, तर हिंदूंचीच सत्ता हवी.

‘यापुढील गडकोट मोहीम ‘विशाळगड ते पन्हाळगड’, अशी होणार आहे’, असे पू. भिडेगुरुजी यांनी घोषित केले.

मद्याच्या दुकानांना अनुमती, तर श्री दुर्गामाता दौडीस बंदी !

दळणवळण बंदीच्या काळात केवळ २१ दिवसांनंतर महसूल मिळण्याच्या लालसेपोटी शासनकर्ते मद्याची दुकाने उघडण्यास अनुमती देतात. याउलट श्री दुर्गामाता दौडीसारख्या पवित्र गोष्टीवर बंदी घातली जाते, हे क्लेशदायक आहे. अशी बंदी घातल्यावर आमचे लोकप्रतिनिधी शासनकर्त्यांना खडसावत नाहीत, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.