१. पहिला दिवस
१ अ. नवरात्रीतील भाववृद्धी सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा ९ दिवस सत्संग मिळणार असल्याचे कळल्यावर कृतज्ञता व्यक्त होणे आणि ‘देवीच प्रतिदिन चैतन्य अन् शक्ती देणार’, असे वाटणे : ‘१७.१०.२०२० या नवरात्रीतील भावसत्संगाच्या पहिल्या दिवशी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा ९ दिवस सत्संग मिळणार’, हे कळल्यावर माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. सत्संग चालू होण्यापूर्वी ‘प्रत्यक्ष देवीचाच सत्संग मिळणार, तसेच देवी आपल्याला प्रतिदिन १ घंटा चैतन्य, शक्ती आणि साधनेसाठी प्रोत्साहन देणार आहे’, असे वाटले.
१ आ. सत्संग चालू झाल्यावर अंगावर शहारे येणे, भावजागृती होणे आणि प्रार्थना होऊन शेवटपर्यंत भावस्थितीत रहाणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सत्संग चालू केला. त्या वेळी माझ्या अंगावर शहारे येत होते आणि माझी भावजागृती होत होती. माझ्याकडून कुलदेवीचे स्मरण होऊन प्रार्थना झाली. ‘आई, तू कुठे आहेस ? आज तुला या लेकराने मारलेल्या हाकेला धावून यावेच लागेल. ये ना गं आई ! मला साधना करण्यासाठी शक्ती दे ना गं आई !’, असे म्हणत मी लहान बाळ होऊन सूक्ष्मातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासमोर गेले आणि त्यांच्या चरणांवर डोके टेकवून रडले. त्या वेळी ‘आई, मला तुझ्याजवळच रहायचे आहे. तुझ्यापासून दूर जायचे नाही’, असे मी म्हणत होते. सत्संगाच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत ही स्थिती होती. ‘या स्थितीतून बाहेर येऊच नये आणि सत्संगही संपू नये, ऐकत रहावा’, असे मला वाटत होते.
१ इ. सत्संग संपताक्षणी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ भोजनकक्षातून येत असल्याचे दिसणे आणि ‘त्यांच्या रूपात लक्ष्मीदेवी येऊन साधकांना आनंदच देत आहे’, असे जाणवणे : सत्संग संपताक्षणी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ मला भोजनकक्षातून येत असल्याचे दिसले. ‘एक देवी साधकांना भाववृद्धी सत्संगात डुंबवत होती. त्या स्थितीतून बाहेर येईपर्यंत दुसर्या देवीचे आश्रमात आगमन झाले’, असे मला वाटले. त्याच क्षणी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. ‘भूमाता आपल्या आजूबाजूचा समाज आणि जगभरातील साधक यांना सत्संगात ठेवत आहे अन् साधकांभोवती कवच निर्माण करून त्यांना कुशीत घेऊन आनंद देत आहे, तर लक्ष्मीदेवी प्रत्यक्षात स्वतःहून आश्रमात येऊन साधकांना आनंदच देत आहे’, असे मला जाणवले.
२. दुसरा दिवस
२ अ. दुसर्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सत्संगात बोलत असतांना ‘आईच आपल्या बाळांसाठी भूतलावर अवतरली आहे’, असे वाटणे आणि ‘सर्व देवीदेवता सत्संगात उपस्थित राहून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे जाणवणे : १८.१०.२०२० या दुसर्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सत्संगात बोलत होत्या. त्या वेळी त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष देवीच बोलत असून त्यांच्या बोलण्यात शक्ती, चैतन्य आणि वात्सल्यभाव जाणवत होता. ‘आईच आपल्या बाळांसाठी भूतलावर अवतरली आहे’, असे मला वाटले. देवी विराट रूपात दिसत होती. ‘आम्ही सर्व साधक तिची लहान बाळे बनून तिची स्तुती करत आहोत, तर काही बाळे नृत्य करून तिला आलिंगन देत आहेत’, असे मला जाणवले. ‘सर्व देवीदेवताही सत्संगात उपस्थित राहून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला जाणवले.
३. तिसरा दिवस
३ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आवाजातील चैतन्य वाढत जात असल्याचे जाणवणे आणि वातावरणात देवीतत्त्व, आनंद अन् हलकेपणा जाणवणे : १९.१०.२०२० या तिसर्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सत्संगात बोलायला आरंभ केल्यावर अंगावर शहारे येत होते. ‘सत्संगाचे दिवस जसजसे पुढे जात होते, तसतसे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आवाजातील चैतन्य वाढत आहे’, असे जाणवत होते. मला सत्संगातील काही भागाचे आकलन होत होते, तर काही भागाचे आकलन होत नव्हते. त्या इतक्या उच्च स्तरावर बोलत होत्या की, ते कळतच नव्हते. ‘त्यांच्याकडून शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते. वातावरणात देवीतत्त्व, आनंद आणि हलकेपणा जाणवत होता. देवीचे भजन लावल्यावर माझी भावजागृती होत होती.
४. चौथा दिवस
२०.१०.२०२० या चौथ्या दिवशी सत्संग चालू होण्यापूर्वी पाऊण घंटा मला पुष्कळ थंडी वाजत होती. सत्संगाला आरंभ झाल्यावर माझ्या अंगावर शहारे येत होते. देवीची आठवण येऊन मला रडू येत होते आणि माझ्या डोळ्यांतून वहाणारे अश्रू थांबतच नव्हते.
५. पाचवा ते आठवा दिवस
२१.१०.२०२० ते २४.१०.२०२० या कालावधीत सत्संग चालू होण्यापूर्वी मला पुष्कळ थंडी वाजायची. सत्संग चालू झाल्यावर अंग गरम होत असे आणि नंतर शहारत असे. सत्संग संपेपर्यंत अधूनमधून अंगावर शहारे येत होते. त्यानंतर १ घंटा पुष्कळ थंडी वाजत होती.
६. नववा दिवस आणि दसरा
६ अ. सरस्वतीदेवीचे भजन ऐकतांना भावजागृती होणे आणि देवीच्या चरणी प्रार्थना होणे : २५.१०.२०२० या ९ व्या आणि दसर्याच्या दिवशी सरस्वतीदेवीचे भजन ऐकतांना भावजागृती झाली. माझ्याकडून पुढील प्रार्थना झाली, ‘देवी, तूच माझ्या वाणीत चैतन्य निर्माण कर. आई, ‘साधकांशी कसे बोलायचे ?’, ते तूच मला शिकव.’
६ आ. कमळामध्ये बसलेली शारदादेवी वीणा वाजवत असल्याचे दिसणे, मन शांत आणि स्थिर होणे, तिने भावविश्वात घेऊन जाणे अन् ‘सत्संग संपू नये’, असे वाटणे : त्या वेळी मला देवी कमळावर बसलेली दिसत होती. कोकिळा गात होत्या. माझे मन शांत आणि स्थिर झाले होते. त्यानंतर सर्व साधक लहान बाळे होऊन एका ठिकाणी हिरवळीवर (गवतावर) बसलेली दिसत होती. शारदादेवी वीणा वाजवत होती. ती पुष्कळ तल्लीन झाली होती. ती अधूनमधून आम्हा सर्वांकडे वात्सल्यभावाने पहात होती. आम्हाला जणू ती वीणा वाजवून आणि भजन म्हणून भावविश्वातच घेऊन गेली. ‘त्या विश्वातून बाहेर येऊ नये, हा सत्संग संपूच नये आणि या स्थितीतच रहावे’, असे मला वाटत होते.
७. नवरात्रातील ९ दिवस देवीला सूक्ष्मातून आढावा देणे
मी या ९ दिवसांत चहा न पिण्याचे प्रायश्चित्त घेतले. ‘प्रतिदिन आदल्या दिवशी शिकवलेल्या सूत्रावर प्रयत्न करूनच सत्संगाला जायचे’, असे ध्येय मी ठेवले होते. देवी आपल्याला पहात असते. तिचे आपल्याकडे लक्ष असते; म्हणून मी ‘आईला काय आढावा द्यायचा ?’, हे ठरवत असे. मी सत्संगापूर्वी ५ मिनिटे तिला आढावा देत होते.’
– कु. प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१०.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |