सौ. नीता मनोज सोलंकी यांच्या समवेत आणि त्या नसतांना गरबा नृत्याच्या प्रयोगाच्या वेळी सौ. अवनी संदीप आळशी यांना जाणवलेली सूत्रे

वर्ष २०२० च्या नवरात्रोत्सवाच्या काळात सौ. नीता सोलंकी यांच्या समवेत तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे आणि नसणारे साधक यांनी गरबा नृत्य करणे अन् त्या नसतांना याच साधकांनी गरबा नृत्य करणे, असा एक प्रयोग संशोधनाच्या दृष्टीने घेण्यात आला होता. त्या वेळी सौ. अवनी संदीप आळशी यांना आलेल्या अनूभूती आणि गरब्याच्या माध्यमातून त्यांना झालेला आध्यात्मिक लाभ येथे देत आहोत.

सौ. अवनी संदीप आळशी
सौ. नीता मनोज सोलंकी

प्रयोग १ : सौ. नीता सोलंकी यांच्या समवेत गरबा नृत्य करतांना 

१. ‘प्रयोग चालू होण्यापूर्वी माझे डोके पुष्कळ दुखत होते आणि मला थकवा जाणवत होता. मी प्रयोगासाठी चित्रीकरण कक्षात आले आणि डोकेदुखी अल्प होऊन काही मिनिटांतच ती पूर्णपणे थांबली.

२. चित्रीकरण कक्षात आल्यावर वातावरण पुष्कळ चैतन्यमय वाटत होते आणि माझा भाव जागृत होत होता.

३. सौ. नीता सोलंकी गरबा करत असतांना त्यांच्यात भाव जाणवत होता. ‘त्यांचे नृत्य बघत रहावे’, असे वाटत होते. त्यांच्या नृत्यातून पुष्कळ चांगली स्पंदने येत होती. ‘त्या स्वतःला विसरून देवासाठी नाचत आहेत’, असे वाटत होते.

४. मी त्यांच्या समवेत काही वेळ नाचले; परंतु त्या वेळी मला त्रास देणार्‍या सूक्ष्मातील वाईट शक्तीचे अस्तित्व अधिक होते. त्यामुळे त्यांच्या नाचाच्या हालचाली (‘स्टेप्स’) मला आकलन होत नव्हत्या. माझा त्यांच्या समवेत नाचतांना गोंधळ होत होता. त्यामुळे मला त्यांच्यासारखे नाचता येत नव्हते, तरी नृत्य करतांना पुष्कळ आनंद मिळत होता. ‘मी हलकी हलकी होत आहे’, असे मला वाटत होते.

५. गरबा करतांना सर्वांच्या सात्त्विक हालचालीत एकसारखेपणा हवा होता; परंतु ‘सूक्ष्मातील वाईट शक्तीला वेडेवाकडे हातवारे करून नाचावे’, असे वाटत होते.

६. ‘मला गरबा करतांना नीट नाचता येत नाही’, असा माझ्या मनात विचार वाईट शक्तीने घातला. त्यामुळे ‘नाचायला नको’, असे वाटून मी जागेवर जाऊन बसले.

गरबा नृत्य करतांना सौ. नीता सोलंकी

प्रयोग २ : सौ. नीता सोलंकी नसतांना गरबा नृत्य करतांना

१. मी गरबा नृत्य करत असतांना तेथे सौ. नीता सोलंकी उपस्थित नव्हत्या, तरी नाचतांना मनाच्या गोंधळाचे प्रमाण अल्प झाले होते. वाईट शक्ती नाचतांना माझा आत्मविश्वास न्यून करत होती, तरी मी मात करून नाचत होते.

२. मी साधारण ३० मिनिटे नाचले, तरी मला थकवा जाणवला नाही.

३. गरब्याच्या गाण्याने माझा भाव जागृत होत होता. त्या वेळी ‘देवीसाठी नृत्य करत आहे’, या भावाने मी नाचत होते. ‘तेव्हा आम्हा साधकांसह देवी प्रत्यक्ष मधे उभी आहे’, असे वाटत होते.

४. हे नृत्य करतांना मला सूक्ष्मातील वाईट शक्तीचे अस्तित्व जाणवत नव्हते. ‘मीच नृत्य करत आहे’, असे मला वाटत होते.

प्रयोग चालू होण्यापूर्वी मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता. माझ्या मनाची स्थिती चांगली नव्हती, तरी गरब्याच्या प्रयोगानंतर तो त्रास अल्प होऊन आनंद जाणवला.’

– सौ. अवनी संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१०.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक