शुद्ध अंतःकरणाने केलेली सेवा गुरुचरणी समर्पित होते ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, कर्नाटक राज्य

‘आपली साधना म्हणून ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ कसे राबवायचे ?’, या विषयावर पू. रमानंद गौडा यांचे अमूल्य मार्गदर्शन !

पू. रमानंद गौडा

मंगळुरू – ‘निर्मळ मनात भगवंत वास करतो. अंतःकरणात असलेले आपले दोष आणि अहं नष्ट झाल्यास आपले मन शुद्ध होते. त्या वेळी आपण कुठेही असलो, तरी ते गुरुदेवांना दिसते. शुद्ध अंतःकरणाने केलेली सेवा गुरुचरणी समर्पित होते’, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले.  १० ऑक्टोबर २०२१ या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘आपली व्यष्टी साधना उत्तम रितीने करत ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ आपली साधना म्हणून कसे राबवू शकतो ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ माध्यमातून त्यांनी साधक, धर्मप्रेमी, हितचिंतक आदिंना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा अनुमाने १ सहस्र ३४२ जणांनी लाभ घेतला. त्याचप्रमाणे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानात’ आतापर्यंत झालेल्या प्रयत्नांचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विजय रेवणकर यांनी मांडला. सत्संगाचा उद्देश धर्मप्रचारक ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. काशिनाथ प्रभु यांनी सांगितला.

दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

पू. रमानंद गौडा यांनी मार्गदर्शनात  मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. सनातनचे ग्रंथ म्हणजे कलियुगातील भगवद्गीता आहे.

२. शब्दजन्य ज्ञान बुद्धीने ग्रहण करू शकतो; परंतु परात्पर गुरूंची ज्ञानशक्ती बुद्धीअगम्य आहे; म्हणजेच बुद्धीच्या पलीकडे असून ती शब्दातीत कार्य करत आहे.

३. सनातनच्या ग्रंथांचे जे अध्ययन करतात, त्यांना या ग्रंथातील ज्ञान आणि चैतन्य यांमुळे त्यांचे पुढील साधनेचे मार्गक्रमणही शीघ्र गतीने होते.

४. परात्पर गुरुदेवांचे ग्रंथ दैवी स्रोताप्रमाणे कार्य करत आहेत. हे केवळ ग्रंथ नसून ईश्वरी वाणीच आहे. त्यात ईश्वरी चैतन्य ओतप्रोत भरले आहे.

५. हे ग्रंथ समाजात पूर्ण पालट करून अंधःकारातील जीवांना ज्ञान देऊन प्रकाशाकडे घेऊन जात आहेत.

६. कालमहिम्यानुसार ज्ञानशक्तीचा प्रसार करणे; म्हणजे गुरूंची स्तुती करणेच आहे.

अभिप्राय

१. ‘या अभियानाचा केवळ हगरिबोम्मनहळ्ळी येथेच नव्हे, तर इतर जिल्ह्यांतही प्रसार झाला पाहिजे. प्रत्येक तालुक्यात सर्वांपर्यंत पोचले पाहिजे’, असे मनात विचार येत होते. – सौ. संगीता जन्नु, हगरिबोम्मनहळ्ळी, कर्नाटक.

२. संत अमूल्य अशा सत्संगातून आम्हाला सेवा करण्यासाठी शक्ती देऊन आमच्या मनाची सिद्धता करत आहेत.

पू. रमानंद अण्णांचे मार्गदर्शन ऐकून ‘आता २४ घंटे सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत’, असे वाटते. – सौ. सुनीता, बेंगळुरू, कर्नाटक.

अनुभूती

१. आज सत्संगात प्रारंभापासून अंतापर्यंत घरात सुगंध येत होता. – सौ. लक्ष्मी गुरव, बेंगळुरू, कर्नाटक.

२. पू. रमानंद अण्णा मार्गदर्शन करत असतांना मला पुष्कळ चैतन्य प्राप्त होत होते. – सौ. संगीता जन्नु, हगरिबोम्मनहळ्ळी, कर्नाटक.