आदिशक्तीचे योगमाया स्वरूप आणि तिने केलेला असुरांचा नाश !

१. अष्टमीला प्रकट होणार्‍या योगमायेची कळण्यास कठीण असणारी माया !

‘अष्टमी तिथी म्हटले की, आपल्या सर्वांना श्रावण मासातील ‘कृष्णाष्टमी’ आणि आश्विन मासातील ‘दुर्गाष्टमी’ आठवते. यात वैशिष्ट्य म्हणजे ‘अष्टमी’ ही तिथी आदिशक्तीशी निगडित आहे. कृष्णाष्टमीला श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी आदिशक्ति स्वतः ‘योगमाया’ रूपात जन्म घेते. ‘योगमाया’, म्हणजे जगत्जननी होय ! तिची माया अनंत आणि अवर्णनीय आहे. हीच ‘योगमाया’ श्रीविष्णूच्या श्रीरामावतारात सीता बनून आली आणि रावणासुराच्या बंधनात राहिली. साक्षात् आदिशक्तीला एका असुराच्या बंधनात रहाण्याचे काय कारण ? ‘हीच तिची माया आहे’, जी कुणीही समजू शकत नाही.

२. आदिशक्ति योगमायेच्या साहाय्याने श्रीविष्णूने मधु आणि कैटभ या असुरांचा नाश करणे

२ अ. श्रीविष्णूच्या कानाच्या मळातून मधू आणि कैटभ या राक्षसांची निर्मिती होणे, त्यांनी देवीचे मंत्र म्हणून कठोर तप करणे, देवी प्रसन्न झाल्यावर त्यांनी देवीकडून इच्छामरणाचा वर मागून घेणे : पृथ्वीची उत्पत्ती होण्यापूर्वी क्षीरसागरात श्रीविष्णु सहस्र फण्यांच्या शेषनागावर पहुडला होता. त्याच्या कानातील मळातून मधु आणि कैटभ या नावांच्या २ असुरांची निर्मिती झाली. तेव्हा श्रीविष्णु योगनिद्रेत होता. मधु आणि कैटभ क्षीरसागरात राहून ध्यान करू लागले. त्यांना आदिशक्तीचे वाक्मंत्र ऐकू आले. त्यांनी त्या मंत्रांचा उच्चार करायला आरंभ केला. अनेक वर्षे त्यांनी कठोर तपश्चर्या केली. देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि तिने त्यांना इच्छामरणाचे वरदान दिले.

२ आ. मधू आणि कैटभ या असुरांनी ब्रह्माला खाण्याचा प्रयत्न करणे, ब्रह्मदेवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने या असुरांशी ५ सहस्र वर्षे युद्ध करणे; परंतु देवीकडून मिळालेल्या इच्छामरणाच्या वरामुळे त्यांना मारणे अशक्य होणे : देवीकडून इच्छामरणाचे वरदान मिळाल्याने ते दोघे असुर ब्रह्मलोकात गेले आणि ब्रह्मालाच खायला निघाले. ब्रह्मदेवाने श्रीविष्णूकडे जाऊन त्याला प्रार्थना केली. श्रीविष्णूने मधु आणि कैटभ यांच्याशी युद्ध करायचे ठरवले. श्रीविष्णु आणि त्या दोन असुरांमध्ये ५ सहस्र वर्षे युद्ध चालले. श्रीमहाविष्णु थकले, तरी मधु-कैटभ थोडेही थकले नाहीत. त्यामुळे श्रीविष्णूने युद्धविरामाची घोषणा केली. श्रीविष्णूला प्रश्न पडला, ‘या दोन असुरांचा मृत्यू का होत नाही ?’ तेव्हा श्रीविष्णूच्या लक्षात आले, ‘देवीने या दोन्ही असुरांना इच्छामरणाचे वरदान दिले असल्याने त्यांना मारणे अशक्य आहे.’ त्यामुळे श्रीविष्णूने आदिशक्तीचे स्मरण केले.

२ इ. श्रीविष्णूने आदिशक्तीलाच मधू आणि कैटभ यांना मारण्याचा उपाय विचारून घेणे : आदिशक्तीनेच त्या दैत्यांना वरदान दिल्यामुळे असुरांना मारण्याचे उपाय देवीलाच विचारावे लागणार होते. भगवंताने अत्यंत दीनभावाने आणि सुंदर शब्दांत देवीची स्तुती केली. देवी अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाली, ‘हे श्रीहरि, युद्धाच्या वेळी मी माझे ‘योगमाया’ रूप धारण करून त्या दोन्ही असुरांना मोहित करते. त्या वेळी तुम्ही योग्य तो उपाय करावा.’

२ ई. आदिशक्तीने दोन्ही असुरांना मोहित केल्याचे पाहून श्रीविष्णूने युद्ध थांबवून त्या दोघांना वर मागण्यास सांगणे : श्रीविष्णु आणि त्या दोन्ही असुरांमध्ये पुन्हा युद्ध चालू झाले. युद्धात एक क्षण असा आला की, श्रीविष्णूने आदिशक्तीकडे अत्यंत करुणेने पाहिले. तेव्हा देवी हसली. ती युद्धभूमीवर आली आणि तिने त्या दोन्ही असुरांना मोहित केले. तिचे सुंदर रूप पाहून दोन्ही असुर मंत्रमुग्ध झाले. ‘दोघेही मोहित झाले आहेत’, हे बघून श्रीविष्णूने युद्ध थांबवले आणि म्हणाले, ‘‘आजपर्यंत तुमच्यासारखे शूर-वीर मी पाहिले नाहीत. मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तुम्ही जो वर मागाल, तो द्यायला मी सिद्ध आहे.’’

२ उ. मधू आणि कैटभ यांनी अहंकाराने श्रीविष्णूलाच वर मागण्यास सांगितल्यावर श्रीविष्णूने ‘तुमचा मृत्यू माझ्या हाती होवो’, हा वर मागणे : आश्चर्य म्हणजे योगमायेने मोहित झालेले ते दोन्ही असुर श्रीविष्णूला म्हणाले, ‘‘विष्णु, तू आम्हाला काय देणार ? आम्ही याचक नसून दाता आहोत. आम्हीच तुला वर देऊ. ‘तू आमच्याशी एवढी वर्षे युद्ध केलेस’, यासाठी आम्हीच तुझ्यावर प्रसन्न आहोत. ‘तुला आमच्याकडे काय मागायचे आहे ?’, ते तू माग.’’ श्रीविष्णूने हीच वेळ साधून त्यांना सांगितले, ‘तुम्हाला मला वरदान द्यायचे असेल, तर ‘तुमचा मृत्यू माझ्या हातून होवो’, हेच वरदान मला द्या.’

२ ऊ. योगमायेच्या कृपेने श्रीविष्णूने अत्यंत बलशाली अशा मधु आणि कैटभ या असुरांचा नाश करणे : मधु आणि कैटभ यांना ‘आपण फसलो !’, हे लक्षात आले. त्यांना दुःख झाले. त्या वेळी सर्वत्र क्षीरसागरच होता. पृथ्वी कुठेही नव्हती. मधु आणि कैटभ यांनी श्रीविष्णूला सांगितले, ‘हे जर्नादन, या आधी तुम्हीही आम्हाला वर देण्याचे वचन दिले आहे. आम्हाला जेथे पाणी नाही, अशा ठिकाणी तुझ्या हातातून मृत्यू यावा.’ लगेच श्रीविष्णूने विराटरूप धारण केले. श्रीविष्णूचे रूप क्षीरसागरापेक्षाही विशाल झाले. त्याने मधु आणि कैटभ यांना त्याच्या जांघेवर मस्तक ठेवण्यास सांगून सुदर्शनचक्राने त्यांचे धड शरिरापासून वेगळे केले. अशा प्रकारे योगमायेच्या कृपेने श्रीविष्णूने अत्यंत बलशाली अशा मधु आणि कैटभ या असुरांचा नाश केला.

‘योगमाया आदिशक्ति कसे कार्य करते आणि संपूर्ण सृष्टीचक्र तिच्या कृपेने कसे चालत आले आहे ?’, हे आपण पुढे पाहू. उद्या महानवमी आहे. नवरात्रातील शेवटचा दिवस. जगत्जननी, महामाया, दैत्यसंहारिणी, त्रिभुवननायिका श्री दुर्गादेवीचा विजय असो !’

– श्री. विनायक शानभाग, बेंगळुरू (२५.९.२०२१)