शक्तिदेवता !

नवरात्रीनिमित्त प्रतिदिन वाचा विशेष सदर…

वृषभ वाहनावर आरूढ असलेली श्री महागौरीदेवी

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेत आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय ! सनातन संस्थेचे साधक गेली अनेक वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातनच्या साधकांकडून आरंभी आदिशक्तीची उपासना करवून घेतली आहे. त्याविषयी प्रतिदिन आपण जाणून घेत आहोत. कालमाहात्म्यानुसार आपण हिंदु राष्ट्राची वाट बघत वैश्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जगज्जननी आदिशक्ति लयकारीही आहे. ‘ती हिंदु राष्ट्र कसे घडवून आणणार आहे ?’, हे आपण या नवरात्रीच्या काळात जाणून घेऊया. आपण आदिशक्तीला भावभक्तीने आळवूया आणि तिची कृपा संपादन करूया. १२ ऑक्टोबरला महाकालस्वरूपिणी श्री कालरात्रीदेवीची वैशिष्ट्ये आणि तिचे कार्य यांविषयी माहिती पाहिली. आज त्या पुढील माहिती पाहूया.

नवरात्रीच्या आठव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तिदेवीचे ‘महागौरी’ रूप !

आश्विन शुक्ल पक्ष अष्टमी, दुर्गाष्टमी (१३.१०.२०२१)

श्री. विनायक शानभाग

अ. ‘शिव पती म्हणून लाभावा’, यासाठी देवीने केलेल्या कठोर तपामुळे तिचे शरीर काळे पडणे, शिवाने प्रसन्न होऊन तिला पवित्र गंगाजलाने स्नान घालणे, तेव्हा देवीचे गौर रूप दिसणे; म्हणून तिला ‘महागौरी’ म्हटले जाणे : नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला आदिशक्तीची ‘महागौरी’ या रूपात पूजा केली जाते. या रूपात देवीला आठ वर्षांची मुलगी मानले आहे. देवीने परिधान केलेल्या वस्त्राचा रंग पांढरा आहे. देवीला चार भुजा असून देवीचे वाहन वृषभ आहे. देवीने लहान वयातच शिवाला पती मानले होते. ‘शिव पती म्हणून लाभावा’, यासाठी देवीने तिच्या पार्वती रूपात कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे देवीचे शरीर काळे पडले. देवीच्या तपश्चर्येने शिव प्रसन्न झाला. त्याने गंगेच्या पवित्र जलाने देवीचे शरीर धुतले. त्यामुळे देवीचे शरीर स्वच्छ पांढरे झाले. संस्कृत भाषेत स्वच्छ पांढर्‍या रंगाला ‘गौर वर्ण’ असे म्हणतात. यामुळे देवीला ‘महागौरी’ असे नाव पडले.

आदिशक्ति तिच्या महागौरी रूपात ‘भक्तांचे ताप, पाप आणि संचित धुऊन काढते’, असे शास्त्रात म्हटले आहे. थोडक्यात महागौरीच्या उपासनेने भक्त पवित्र बनतो आणि त्याची अंतर्-बाह्य शुद्धी होते. महागौरीचे वैशिष्ट्य म्हणजे देवी मनुष्याला सत्कडे जाण्याची प्रेरणा देते.

प्रार्थना

‘हे महागौरी, ज्याप्रमाणे तू भक्तांचे ताप, पाप आणि संचित नष्ट करतेस, त्याप्रमाणे तू आम्हा साधकांचे ताप, पाप आणि संचित नष्ट कर. हे देवी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला शिकवल्यानुसार आमच्याकडून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन योग्य प्रकारे होऊन आमची अंतर्-बाह्य शुद्धी होऊन आमची साधना होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. ‘हे देवी, तू आम्हाला नेहमी सत्मध्ये रहाण्याची प्रेरणा दे आणि आमच्याकडून निर्मळ मनाने गुरुसेवा घडू दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विनायक शानभाग (६६ टक्के आध्यात्मिक पातळी), बेंगळुरू (२५.९.२०२१)