उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. निर्मयी मंदार मांजरेकर ही एक आहे !
डोंबिवली, ठाणे येथील चि. निर्मयी मंदार मांजरेकर हिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर तिच्या आई-वडिलांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे अन् तिच्या अन्य नातेवाईकांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. गरोदरपण
१ अ. ८ मास – पू. भार्गवराम प्रभु यांचा ‘संतसन्मान सोहळा’ पहातांना ‘स्वतःच्या पोटी उच्च लोकातील जीव जन्माला येऊ दे’, अशी साधिकेची प्रार्थना होऊन पुष्कळ भावजागृती होणे : ‘दुसर्या अपत्याच्या वेळी मी ८ मासांची गरोदर होते. तेव्हा मला जळगाव सेवाकेंद्रात सनातनचे पहिले बालक-संत पू. भार्गवराम प्रभु यांच्या सन्मानाचा ऑनलाईन स्वरुपातील सोहळा बघायची संधी मिळाली. हा सोहळा बघत असतांना मी पूर्णवेळ माझ्या पोटावर हात ठेवून बसले होते. त्या वेळी ‘गर्भातील बाळाला पुष्कळ चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवत होते. तेव्हा ‘माझ्या पोटीही असा उच्च लोकातील जीव जन्माला येऊ दे’, अशी मी देवाला प्रार्थना करत होते. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती होत होती.
१ आ. ९ मास – जळगाव सेवाकेंद्रात गुरुपादुकांचे पूजन चालू असतांना साधिकेने पोटावर हात ठेवून नामजप करणे, त्या वेळी तिला पुष्कळ आनंद होऊन गर्भाला गुरुपादुकांचे चैतन्य मिळाल्याने कृतज्ञता वाटणे : मी नऊ मासांची गरोदर असतांना जळगाव सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉक्टरांच्या गुरुपादुका आल्या. तेव्हा मला आईसमवेत पादुकापूजनाची सिद्धता करण्याची सेवा मिळाली. गुरुपादुकांचे पूजन चालू असतांना मी पोटावर हात ठेवून नामजप करत होते. तेव्हा मला फार आनंद होत होता. ‘गर्भातील बाळाला गुरुदेवांच्या पादुकांचे चैतन्य मिळाले’, यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
गरोदरपणाच्या कालावधीत गर्भाला चैतन्यदायी सोहळे अनुभवायला मिळाले. त्यामुळे मला देवाच्या चरणी कृतज्ञता वाटत होती.
१ इ. ‘प्राचीन भारतीय परंपरेनुसार स्वतःचे गरोदरपण आणि प्रसुती व्हावी’, अशी इच्छा असल्याने साधिकेने पूर्ण ९ मास केवळ पंचगव्य अन् घरचा आहार घेणे : ‘माझे गरोदरपण आणि प्रसुती प्राचीन भारतीय परंपरेनुसार व्हावी’, अशी माझी पुष्कळ इच्छा होती. त्याप्रमाणे संपूर्ण गरोदरपणात मी केवळ ‘देशी गायीचे पंचगव्य (दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय रस) आणि घरचा आहार’, हेच घेतले. गरोदरपणात केवळ आयुर्वेदाचे काही उपचार आणि पंचगव्याचे सेवन यांमुळे गर्भाचे पोषण उत्तम रितीने झाले.
२. प्रसुती
वैद्यांनी ‘बाळाचे वजन अधिक असल्यामुळे प्रसुतीसाठी अधिक वेळ थांबता येणार नाही आणि शस्त्रकर्म करावे लागेल’, असे मला सांगितले. त्या वेळी माझ्या मनाची लगेच सिद्धता झाली. त्या क्षणी माझे मन पुष्कळ स्थिर आणि शांत होते. वैद्यांनी वाजवी मूल्यात शस्त्रकर्म केले. ते वैद्य सनातन संस्थेचे हितचिंतक आहेत.
पहिल्या बाळंतपणात माझी पुष्कळ चिडचिड आणि त्रागा झाला होता. या वेळी गरोदरपणी आणि बाळंतपणातही मला पुष्कळ उत्साह जाणवत होता. कोणत्याही प्रसंगात मी शांत आणि स्थिर राहू शकत होते.’
– सौ. मंजिरी मंदार मांजरेकर (चि. निर्मयीची आई), डोंबिवली, ठाणे. (मे २०२०)
३. बाळाच्या जन्मानंतर
३ अ. जन्म ते १ मास
३ अ १. दुसर्यांदा मुलगी झाल्यानंतर ‘ईश्वरी राज्यासाठी जणू रणरागिणी आली’, असे साधकाला वाटणे : ‘इतक्या वर्षांनी तुम्हाला दुसरी बालिका झाली आहे, तर मुलगा झाला असता, तर बरे झाले असते’, असे काही नातेवाईक मला म्हणाले; परंतु मी आणि पत्नी सौ. मंजिरी दोघेही स्थिर होतो. पुढे ‘ईश्वरी राज्यात स्त्रियांचाच सहभाग अधिक असणार आहे’, हे परात्पर गुरु डॉक्टरांचे बोल मला आठवले आणि ‘आपल्याकडे रणरागिणीच आली आहे’, अशी माझी विचारप्रक्रिया झाली.’ – श्री. मंदार मांजरेकर
३ अ २. साधिकेने बालिकेला २१ दिवस पंचगव्याचे चाटण देणे, त्यामुळे बाळाची प्रकृती चांगली असणे : निर्मयीच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून ते २१ व्या दिवसापर्यंत आम्ही प्रतिदिन देशी गायीचे पंचगव्य (दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय रस) एकत्र करून निर्मयीला त्याचे चाटण दिले. केवळ हे एवढेच औषध देऊनही निर्मयी एकदम ठणठणीत आहे.’ – सौ. मंजिरी मंदार मांजरेकर
३ अ ३. निर्मयीला पाळण्यात ठेवले की, ती नमस्काराच्या मुद्रेत झोपणे आणि काही वेळा तिने बोटांची टोके जोडून ध्यानमुद्रा करणे : ‘पहिल्या दिवसापासूनच निर्मयीला पाळण्यात ठेवले की, ती दोन्ही हात जोडून नमस्काराच्या मुद्रेत झोपायची. जेवढा वेळ ती पाळण्यात झोपायची, तेवढा वेळ तिचे हात नमस्काराच्या मुद्रेत जोडलेले असायचे. त्या वेळी ‘ती भगवंताच्या अनुसंधानात आहे’, असे आम्हाला वाटायचे. काही वेळा निर्मयी अंगठा आणि तर्जनी (अंगठ्याजवळील बोट) या बोटांची टोके जोडून ध्यानमुद्रा करून एका कुशीवर झोपायची. ७ – ८ मासांची होईपर्यंत ती असे करायची.
३ आ. वय – २ ते ३ मास
३ आ १. रात्री निर्मयीला झोपवतांना आम्ही रामरक्षा, मारुतिस्तोत्र आणि भजने लावायचो. तेव्हा ती ते ऐकत शांतपणे झोपायची.
३ आ २. कृष्णाष्टमीच्या दिवशी कृष्णजन्म आणि आरती होईपर्यंत निर्मयी जागी रहाणे : कृष्णाष्टमीच्या दिवशी ती आमच्यासमवेत रात्री १२ वाजेपर्यंत जागी होती. आम्ही श्रीकृष्णाची आरती म्हणत असतांना ती शांतपणे ऐकत होती. आम्ही झोपल्यावर ती झोपली.’
– श्री. दत्तात्रेय वाघुळदे (चि. निर्मयीचे आजोबा, आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) आणि सौ. किरण वाघुळदे (चि. निर्मयीची आजी (चि. निर्मयीच्या आईचे आई-वडील)), जळगाव
३ इ. वय – ४ ते ६ मास
३ इ १. निर्मयी एखाद्या कोपर्यात बराच वेळ एकटक बघत रहायची. त्या वेळी तिला ‘सूक्ष्मातील काहीतरी दिसत आहे’, असे मला जाणवायचे.
३ इ २. अन्य संप्रदायानुसार साधना करणार्या एका बाईंना निर्मयीला मर्दन करतांना ‘जणू कृष्णाला मर्दन करण्याची संधी मिळाली’, असे वाटून चांगले वाटणे : एकदा आम्ही लग्नासाठी आमच्या एका नातेवाइकांकडे रहायला गेलो होतो. त्यांच्याकडे मर्दन (मालीश) करणारी एक बाई आली होती. तिने निर्मयीला मर्दन करण्यासाठी हातात घेतले. तेव्हा तिला फार चांगले वाटले. ती सारखी म्हणत होती, ‘‘हा तर कृष्णच आहे. माझे भाग्य थोर आहे. मला या बालिकेला, या कृष्णाला मर्दन करण्याची संधी मिळाली.’’ त्या बाई पुष्कळ सात्त्विक होत्या आणि ‘जीवन विद्या मिशन’ या संप्रदायानुसार साधना करत होत्या.’
– सौ. मंजिरी मंदार मांजरेकर
३ इ ३. श्रीकृष्णाला प्रार्थना करून निर्मयीला झोपवल्यावर ती ५ मिनिटांत झोपणे : ‘एकदा निर्मयीला झोपवत असतांना ती रडत होती. त्यामुळे मी ‘कृष्णबाप्पा, निर्मयीला गाई (झोप) येऊ दे’, अशी प्रार्थना केली. तेव्हा ती लगेच झोपली. तेव्हापासून तिला झोपवतांना मी अशी प्रार्थना केली की, ती ५ मिनिटांतच झोपते. निर्मयी हाताच्या बोटांची मुद्रा करून झोपली की, ते पाहून माझा भाव जागृत होतो आणि आपोआप नामजप चालू होतो.’ – श्रीमती राजश्री मांजरेकर (निर्मयीची आजी, वडिलांची आई)
३ ई. वय – ७ ते ९ मास
३ ई १. ‘निर्मयी श्रीकृष्णच आहे’, असे वाटणे : ‘निर्मयीला खेळवत असतांना तिला ‘विठ्ठल, विठ्ठल कर’, असे म्हटले की, ती लगेच हाताने टाळ्या वाजवते. तिच्याशी खेळतांना मला ‘ती श्रीकृष्णच आहे’, असे वाटते.’
– कु. स्वानंदी मंदार मांजरेकर (निर्मयीची मोठी बहीण, वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)
३ ई २. परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र हातात दिल्यावर निर्मयीने आनंदाने ते घट्ट धरून ठेवणे : ‘निर्मयी ७ मासांची असतांना एकदा मी तिला देवघरात ‘शुभं करोति’ म्हणायला नेले आणि पहिल्यांदाच तिच्या हातात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दिले. त्या वेळी तिला फार आनंद झाला. ती छायाचित्राशी पुष्कळ जोरजोरात बोलून आनंद व्यक्त करत होती. तिने छायाचित्र हातात घट्ट धरून ठेवले होते आणि ते सोडायला सिद्ध नव्हती. तेव्हा ‘गुरुदेवांना भेटून तिला फार आनंद झाला आहे’, असे तिच्याकडे पाहून मला जाणवले.
३ उ. वय – १० ते १२ मास
३ उ १. कार्यक्रमात परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र दिसल्यावर निर्मयीने दोन्ही हात जोडून नमस्कार करणे : १३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरुदेवांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम होता. आम्ही घरी हा कार्यक्रम बघत असतांना गुरुदेवांचे छायाचित्र संगणकावर दिसले की, निर्मयी लगेच दोन्ही हात जोडून नमस्कार करायची.
४. निर्मयीचे स्वभावदोष
निर्मयीच्या हातातून काही वस्तू काढून घेतल्यास ती जोरात रडते.
५. निर्मयीचे लिखाण लिहितांना झालेले त्रास
निर्मयीचे लिखाण लिहायला घेतल्यापासून प्रतिदिन काही अडथळे येऊन लिखाण अपूर्ण रहात होते. लिखाण अंतिम टप्प्यात आले. तेव्हा माझे डोके फार दुखायला लागले आणि मला उलटी झाली. नंतर मला जोरजोरात जांभया येऊ लागल्या.
‘हे गुरुराया, तुम्हीच माझ्याकडून निर्मयीची ही सूत्रे लिहून घेतलीत. तुमच्या कृपेमुळेच निर्मयीच्या माध्यमातून मी हे सर्व अनुभवू शकले’, यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. मंजिरी मंदार मांजरेकर (चि. निर्मयीची आई), डोंबिवली, ठाणे. (१४.५.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |