राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देशमुख यांच्या घरात घुसतांना कार्यकर्त्यांची पोलिसांसमवेत झटापट !
नागपूर – ‘मनी लॉड्रिंग’प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन येथील घरी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (‘सीबीआय’ने) तिसर्यांदा धाड घातली. ‘सीबीआय’चे एकूण ७ अधिकारी देशमुख ११ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ८ वाजता देशमुख यांच्या घरी पोचले. त्यांनी देशमुख यांचा मुलगा आणि सून यांना चौकशीसाठी कह्यात घेतले असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या वेळी देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून देशमुख यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. कार्यकर्त्यांनी सीबीआय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
गेल्या १ मासापासून अनिल देशमुख बेपत्ता आहेत. ते कुठे आहेत ? याचा थांगपत्ता लागत नाही. केवळ देशमुख नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील काही मंडळींचा पत्ता नाही. ‘सीबीआय’चे पथक अनिल देशमुख यांच्या कुटुंबातील मंडळींना शोधण्यासाठी पोचले आहे. त्यांच्या विरोधात ‘लूकआऊट नोटीस’ही काढण्यात आली होती. या नोटीसनंतर शोध कार्यवाही ही कारवाईची पद्धत आहे. त्याअंतर्गत हे पथक पोचले आहे.