देवीउपासना !

सध्या चालू असलेल्या नवरात्रीचे महत्त्व सर्वांना ठाऊक आहे; परंतु सद्यःस्थितीत नवरात्रीकडे कोणत्या दृष्टीने पहायला हवे, हे महत्त्वाचे आहे ! नवरात्र म्हणजे अखंड जागृती ! नऊ दिवस अखंड साधना करणे ! तेजोपासना, शक्ती उपासनेने आत्मबळ वाढवून चराचर सृष्टीला समृद्धी आणि बळ देणार्‍या आदिशक्तिदेवीचे तत्त्व आपल्यामध्ये जागृत करणे. देवीचे तत्त्व अविनाशी आहे. आपण तिची उपासना करून तिचे तत्त्व स्वतःमध्ये जागृत करण्याचा प्रयत्न केल्यास आपण कोणत्याही संकटाच्या विरुद्ध लढू शकतो. देवीने संहार केलेल्या दैत्य आणि दानव यांच्या कथा आपणास ठाऊक आहेतच !

भारतमाता ही दुर्गादेवीचे म्हणजेच आदिशक्ति जगदंबेचे प्रतीक आहे; परंतु भ्रष्टाचार, बलात्कार, आतंकवाद, गुन्हेगारी, दारिद्र्य, महागाई या आणि यांसारख्या अनेक संकटांनी ती असुरक्षित झाली आहे, तसेच हिंदु धर्म आणि धर्मियांवर अनेक आघात होत आहेत. चहुबाजूंनी संकटात घेरलेल्या मातृभूमीचे संरक्षण करण्याचे दायित्व प्रत्येक भारतियावर आहे. तिच्या रक्षणासाठी, समृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. या प्रयत्नांसाठी आत्मबळ हवे. नवरात्रीच्या काळात शक्तिउपासना केल्यास देवी आपल्याला आत्मबळ देईल ! भारतमातेचे खर्‍या अर्थी रक्षण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच होणार आहे. त्यासाठी घराघरांत आदिशक्तीचा जागर केला पाहिजे. श्री भवानीदेवीचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्य स्थापले, त्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय प्रत्येकानेच उराशी बाळगून सर्वांनी कटीबद्ध होऊया.

नवरात्र हे केवळ बाह्य परिस्थिती पालटण्यासाठी नव्हे, तर अंतरंगामध्ये देवीच्या नवरूपांची जागृती करत अखंड उपासना करण्याचे प्रतीक आहे. अखंड उपासनेने आत्मशक्ती जागृत करून समाज आणि धर्मबांधव यांना बळ पुरवणे आवश्यक आहे अन् हीच खर्‍या अर्थाने समष्टी साधना आहे. आदिशक्ति जगदंबेप्रमाणे ९ दिवस अखंड उपासना करून रज-तमरूपी अंधःकारावर विजय मिळवून सर्वत्र भक्तीचा दीप लावणे, हेच प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जगदंबेच्या चरणी लीन होऊन ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’साठी तिच्या चरणी प्रार्थना करूया. जय जगदंब ! उदयोस्तु (उत्तरोत्तर कीर्ति आणि यश वाढत जावो) ! उदयोस्तु !

– श्रीमती धनश्री देशपांडे, यवतमाळ