पुणे – ‘मी कुठेही पळून जाणार नाही, तसेच मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. यासंदर्भात मला कोणतीही सूचना, नोटीस आलेली नाही. आयकर विभागाच्या अधिकार्यांची चौकशी संपली की, मी पुराव्यानिशी बोलेन’, अशा शब्दांत आयकर विभागाकडून होत असलेल्या कारवाईच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले. विधानभवन येथे कोरोनाच्या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मी सरळ मार्गी असून नागरिकांनी कर चुकवू नये, यासाठी मी आवाहन करत असतो; कारण कराचा पैसा राज्याच्या विकासासाठी वापरला जातो. आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि नातेवाईक यांच्या आस्थापनांवर धाडी टाकल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देतांना ते बोलत होते.