परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करवून घेतलेली आदिशक्तीची उपासना !

१. पूर्वीच्या ऋषीमुनींकडे सूक्ष्मातून जाणण्याची मोठी शक्ती असणे आणि त्यायोगे त्यांनी त्यांना दिसलेल्या देवतांचे वर्णन करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘आदिशक्तीचे सगुण रूप म्हणजे दुर्गादेवी होय ! लाखो वर्षांपूर्वी आता आहे, तसे ऋषीमुनींकडे कुठलेही साधन नव्हते; मात्र त्यांच्याकडे सूक्ष्मातून जाणण्याची अगाध शक्ती होती. त्यांना देवतांचे अस्तित्व आणि ईश्वरी शक्तीचे संकेत कळायचे. ऋषीमुनींना देवतांचे सगुण रूप प्रथम होमाग्नीत दिसले. त्यामुळेच ऋषीमुनींनी त्यांच्या लिखाणात देवतांचे इत्थंभूत वर्णन केले.

२. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणार्‍या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या समोर दुर्गादेवी उभी रहाणे आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार तिचे चित्र काढणे

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

कलियुगात विज्ञानवादाला आरंभ झाला आणि विविध साधने आली. देवतांचे रूप चित्ररूपात साकार करण्याचे साधन आले. अशा वेळी प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने सनातन संस्थेला सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर लाभल्या. त्यांचे चित्रकलेचे शिक्षण झाले होते. पुढे गुरुकृपेने त्यांच्यात सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता निर्माण झाली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्यातील भावामुळे साक्षात् दुर्गादेवी सूक्ष्मातून त्यांच्यासमोर उभी राहिली. देवीनेच सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याकडून तिचे चित्र सिद्ध करून घेतले. पुढे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी ते चित्र पूर्ण केले.

सांप्रत कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या प्रयत्नांनी आदिशक्तीचे, म्हणजेच दुर्गादेवीचे सगुण रूप चित्ररूपात मानवजातीला लाभले आहे. यासाठी संपूर्ण मानवजात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याप्रती सदैव कृतज्ञ रहाणार आहे !

या देवी सर्वभुतेषु छायारूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

– श्रीदुर्गासप्तशती

अर्थ : जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये छायारूपाने विराजमान आहे, त्या देवीला त्रिवार नमस्कार असो.’

– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान (१७.९.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.