६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामचंद्र (दादा) कुंभार यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या सहवासात अनुभवलेले भावक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी दिलेली हस्तलिखिते हातात घेतल्यावर ‘भूमीपासून वर तरंगत जात आहे’, असे जाणवणे

‘वर्ष २००५ मध्ये मी रत्नागिरी जिल्ह्यातील तपोधाम येथे सेवेसाठी जाण्यापूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला उपायांसाठी त्यांची दोन हस्तलिखिते दिली आणि विचारले, ‘‘हे हातात घेतल्यावर काय वाटते ?’’ हस्तलिखिते हातात घेतल्यावर मला ‘मी भूमीपासून वर वर तरंगत जात आहे’, असे वाटत होते. परात्पर गुरुदेवांनी मला सांगितले, ‘‘दिवसभर उपायांसाठी वापरलेले हस्तलिखित रात्री ग्रंथामध्ये किंवा देवासमोर ठेवा आणि भारित झालेले दुसरे हस्तलिखित रात्री वापरा.’’

श्री. रामचंद्र कुंभार

२. पहाटे आश्रमातील मार्गिकेत अकस्मात् परात्पर गुरुदेवांचे दर्शन होऊन त्यांनी साधक पती-पत्नीची चौकशी करणे आणि दिवसभर गुरुमाऊलीचे शब्द अन् ते क्षण आठवून भावस्थिती अनुभवणे

सौ. राजश्री कुंभार

पूर्वी एकदा मला आणि माझी पत्नी सौ. राजश्री हिला रामनाथी आश्रमातील मार्गिकेत सकाळी अकस्मात् परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाले. त्यांनी पत्नीच्या प्रकृतीची चौकशी केली आणि म्हणाले, ‘‘दादा कुंभार आता बरे दिसतात.’’ गुरुदेवांनी पत्नीला विचारले, ‘‘दादांमध्ये तुम्हाला पालट दिसतो ना !’’ त्यानंतर आपले दोन्ही हात वर करून (आशीर्वादाच्या स्थितीत) ते म्हणाले, ‘‘दोघेही जोडीने पुढे पुढे चला !’’ हे ऐकून आम्हा दोघांचाही भाव जागृत झाला.

दिवसभर गुरुमाऊलीचे ते शब्द, तो क्षण आणि ती स्थिती आमच्या डोळ्यांसमोरून जात नव्हती. अजूनही त्या जागेवरून जाता-येता त्या क्षणाची आठवण येऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होते.’

– श्री. रामचंद्र कुंभार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक