‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आश्रमात मी रहाण्यासाठी आले, तेव्हापासून मला कसलीही चिंता वाटत नाही. मला अध्यात्म आणि साधना यांविषयी लिहिण्याची बुद्धी अन् स्फूर्ती त्यांनीच दिली. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, मी आपल्या चरणी प्रार्थना करते की, तुम्हीच माझ्याकडून माझ्या आध्यात्मिक जीवनाचा प्रवास लिहून घ्या.’
१. विवाहानंतरचे जीवन आणि आध्यात्मिक कुटुंब
माझा विवाह श्री. नेताजी तुळजाराम जाधव (नळदुर्ग, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव) यांच्याशी वयाच्या १५ व्या वर्षी सोलापूर येथे झाला. विवाहानंतर आम्ही सोलापूर येथे १६ वर्षे भाड्याच्या घरात राहिलो. मला तीन मुली आणि एक मुलगा आहे. पहिली मुलगी श्रीमती भारती गलांडे, ही रामनाथी आश्रमात सेवा करते. दुसरा मुलगा श्री. रविकिरण जाधव, हा ‘इस्कॉन’नुसार (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ, एक धार्मिक संघटना) साधना करतो. तिसरी मुलगी सौ. संगीता भोईटे, विजापूर, कर्नाटक येथे असते. त्यांच्या घरी साईबाबा आणि कोल्हापूरच्या देवीची भक्ती केली जाते. संभाजीनगर येथील धाकटी मुलगी सौ. विजया जुगदार हीसुद्धा इस्कॉननुसार साधना करते.
२. अध्यात्माची आवड आणि साधना
२ अ. वडिलांनी अध्यात्माची गोडी लावणे : सोलापूर येथील आमच्या घराजवळ विठ्ठल मंदिर होते. माझे वडील माझ्याकडे अधून-मधून येत असत. त्यांनी मला प्रतिदिन त्या मंदिरात श्रवणभक्तीसाठी जाण्यास सांगितले. त्यानंतर एकदा माझ्या माहेरी (अणदूर, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव) मला एक भगवद्गीता मिळाली. तेव्हा माझे वय १६ वर्षे होते. माझे वडील मला म्हणाले, ‘‘तू प्रतिदिन भगवद्गीतेतील एक श्लोक वाचत जा. मी तुला त्याचा अर्थ वाचून दाखवीन. त्यामुळे तुला ती आपोआप वाचायला येऊ लागेल.’’ मी मराठी तिसरीपर्यंत शिकले असल्याने मला चांगले वाचता येत होते. तेव्हापासून मला अध्यात्माची गोडी लागली.
२ आ. चातुर्मासात घराजवळील विठ्ठल मंदिरात अनेक विषयांवरील प्रवचने ऐकायला मिळाल्यामुळे साधनेचा मार्ग मिळणे : चातुर्मासात घराजवळील विठ्ठल मंदिरात प्रतिदिन प्रवचन सांगण्यासाठी एक पंडित येत असत. मीही प्रतिदिन सायंकाळी ६ ते ७ या वेळेत तिथे प्रवचन ऐकण्यासाठी जात असे. तिथे मला रामायण, महाभारत, श्रीमद्भागवत, महापद्मपुराण, मंगलार्चनम्, वायुपुराण, कार्तिक पुराण, माघ मास पुराण, अधिक मास पुराण, दशहरा पुराण, ज्ञानेश्वरी या ग्रंथांवर आधारित अनेक विषयांवरील प्रवचने ऐकायला मिळाली. हे सर्व ऐकतांना मला पुष्कळ आनंद मिळत असे. ही प्रवचने ऐकतांना मला साधनेचा पुढील मार्ग मिळाला आणि परात्पर गुरुदेवांनी मला इथपर्यंत आणले.
२ इ. भगवद्गीतेच्या पारायणात सहभागी होणे : आमच्या नवीन घराच्या जवळ एक दत्त मंदिर होते. तेथे एक गुरुजी होते. ते जवळपासच्या महिलांना भगवद्गीता वाचायला शिकवायचे. त्यात मी सहभागी झाले.
२ ई. भागवतावरील प्रवचन ऐकण्यास जाणे आणि तेथील गुरुजींनी घरी येऊन उपासना सांगणे : वर्ष १९९८ मध्ये मंत्रीचंडकनगर, सोलापूर येथील जगन्नाथ मंदिरात एक संन्यासी ‘भागवता’वर प्रवचन करत असत. ते प्रवचन ऐकायला मी माझ्या मुलाच्या (श्री. रविकिरणच्या) समवेत प्रत्येक रविवारी जात असे. एके दिवशी अकस्मात् ते गुरुजी आमच्या घरी आले आणि मला म्हणाले, ‘‘माताजी, तुम्ही नामजप करता का ? प्रतिदिन २ माळा नामजप करत जा. हळूहळू एकेक माळ वाढवत जाऊन तुम्ही प्रतिदिन १६ माळा नामजप करा. चहा-कॉफी प्यायची नाही, कांदा-लसूण खायचा नाही आणि एकादशीचा उपवास करायचा.’’ ते प्रत्येक रविवारी सत्संगाला यायचे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ३ वर्षे उपासना केली. मी वयाच्या ८ व्या वर्षापासून एकादशीचा उपवास करत होते आणि मागील २० वर्षांपासून मी एकादशीच्या नियमांचे पालन करत आहे.
२ उ. गुरुदीक्षा मिळणे आणि ‘सुदेवी देवीदासी’ असे नामकरण होणे : वर्ष २००१ मध्ये मंत्रीचंडकनगर, सोलापूर येथील जगन्नाथ मंदिरात द्वारका येथून आलेल्या श्री महाविष्णु महाराजांनी आम्हा २५ साधकांना दीक्षा देण्यासाठी बोलावले. त्या दिवशी तेथे ६ घंटे यज्ञ चालू होता. ‘प्रत्येक दिवशी १६ माळा जप करायचा’, असा त्या दीक्षेचा नियम होता. महाराजांनी मला १०८ मण्यांची तुळशीची माळ आणि हरिनामाची एक शाल दिली. ते म्हणाले, ‘‘आज तुमचा नवा जन्म झाला आहे. तुमचे नाव आजपासून ‘सुदेवी देवीदासी’ असे पालटले आहे.’’ वर्ष २००१ पासून पुढे १२ वर्षे माझा एकही सत्संग चुकला नाही. तसेच तेव्हापासून आजपर्यंत प्रतिदिन १६ माळा जप कधीही चुकला नाही.
३. विविध यात्रा
३ अ. माझ्या दोन वेळा गंगासागर यात्रा झाल्या आहेत. १९९९ या वर्षी आम्ही दक्षिण भारत यात्रेला गेलो. त्यानंतर वर्ष २०१० मध्ये ४ धाम यात्रा करण्याचा योग आला.
३ आ. वैशिष्ट्यपूर्ण व्रज भूमीचे दर्शन घडणे : भगवंताची १२ वने आहेत. त्यात यमुना नदीच्या अलीकडे ७ वने आणि पलीकडे ५ वने आहेत. या १२ वनांतील ८४ कोसाच्या (एक कोस म्हणजे ३.२ कि.मी.) परिसरात भगवंताने पायांमध्ये चपला न घालता गायी चरवल्या होत्या. याच भूमीत भगवंताने अनेक असुरांचा वध केला आणि सवंगड्यांसह लीला केल्या होत्या. राधाराणी आणि तिच्या सख्या याच भूमीवरून चालल्या. या सर्व आठवणी असलेली पुष्कळ मंदिरे तिथे आहेत. त्यांचे दर्शन मला घडले.
३ इ. व्रज परिक्रमा करणे : वर्ष २००८ मध्ये आम्ही व्रज परिक्रमेला जाण्याचे नियोजन केले. भगवंताने तुळशीला सांगितले होते, ‘ही ८४ कोसाची परिक्रमा घालणार्याची ८४ लक्ष योनींतून सुटका होते.’ मी तुळशी महाराणीला प्रार्थना केली की, माझी व्रज परिक्रमा भावपूर्ण आणि भक्तीयुक्त अंतःकरणाने पूर्ण व्हावी. मी तुळशी महाराणीला प्रतिदिन १०८ प्रदक्षिणा घालत होते. तिनेच मला शक्ती देऊन माझ्याकडून व्रज परिक्रमा पूर्ण करवून घेतली. मला कसलीच अडचण आली नाही. तसेच सोलापूरमधील जगन्नाथ मंदिरातील २ संन्यासी प्रभूजींनी आम्हाला प्रोत्साहन दिले; म्हणून मी या व्रजपरिक्रमेला जाऊ शकले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने परिक्रमा पूर्णही झाली.
३ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने घडलेले पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन : मला सप्त समुद्राचे दर्शन आणि स्नान झाले. त्यात गोकर्ण महाबळेश्वर, गणपतिपुळे, जगन्नाथपुरी, सोरटी सोमनाथ, रामेश्वर, सिंधुदुर्ग आणि गंगासागर येथील समुद्र आहेत. तसेच मला पवित्र सप्त नद्यांचे दर्शन झाले. त्यामध्ये गोदावरी (नाशिक), चंद्रभागा (पंढरपूर), गंगा (हृषिकेश, हरिद्वार), शरयु (अयोध्या), नर्मदा (ओंकारेश्वर), यमुना (वृंदावन), गंगा-यमुना-सरस्वती त्रिवेणी संगम (अलाहाबाद) अशा नद्या आहेत.
३ उ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या प्रेरणेने यात्रेचे लिखाण करता येणे : देवद आश्रमातील परात्पर गुरु पांडे महाराज मला सतत म्हणायचे, ‘‘तुम्ही विविध यात्रा केल्या आहेत, तर त्या संदर्भात लिहून द्या.’’ त्यांच्याच प्रेरणेने हे लिखाण करू शकत आहे. आज ते असते, तर त्यांना किती आनंद झाला असता ! (परात्पर गुरु पांडे महाराज यांनी वर्ष २०१९ मध्ये देहत्याग केला आहे.) आज तो आनंद मी हरवला आहे.
४. परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेने सनातन संस्थेच्या आश्रमात पूर्णवेळ येणे
४ अ. उत्तरदायी साधकांनी सनातनच्या आश्रमात रहाण्यास सांगणे : माझी मुलगी श्रीमती भारती गलांडे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) सनातनच्या रामनाथी आश्रमात स्वयंपाकघरात सेवा करते. वर्ष २०१२ मध्ये मी आणि माझे यजमान तिला भेटण्यासाठी रामनाथी आश्रमात गेलो असता आम्हाला उत्तरदायी साधक म्हणाले, ‘‘आता तुम्ही इथेच रहा. घरी जाऊ नका.’’ तेव्हा माझे यजमान त्यांना म्हणाले, ‘‘घरात किराणा मालाचे दुकान आहे. ते भाड्याने देऊन येतो.’’ घरी परत आल्यावर त्यांनी दुकान भाड्याने दिले आणि सर्व आवरून आम्ही दोघांनी आश्रमात जाण्याचे नियोजन केले.
४ आ. सनातनच्या आश्रमात रहायला आल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी पूर्वीची साधना चालू ठेवण्यास अनुमती देणे, त्यामुळे आनंद होऊन कृतज्ञता व्यक्त होणे : मुलीने आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे साधना करण्यास सांगितले होते. मी आमच्या संन्यासी प्रभूजींना सनातनच्या आश्रमात जाण्याविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘जा; पण आपली साधना सोडू नका.’’ मग मी परात्पर गुरुमाऊलींना पत्र लिहिले. त्यामध्ये ‘सध्या माझी साधना कोणत्या मार्गाने चालू आहे’, याविषयी लिहिले आणि त्यांच्याकडून माझी सध्याची साधना चालू ठेवण्याविषयी अनुमती मागितली. पत्र पाठवल्यावर दुसर्याच दिवशी सोलापूर येथील साधिका कु. दीपाली मतकर (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) यांचा मला दूरभाष आला. तिने सांगितले, ‘‘परात्पर गुरुदेवांचा निरोप आहे की, तुम्ही आश्रमात आल्यावरही तुमची सध्या चालू असलेली साधना चालू ठेवू शकता.’’ तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. परात्पर गुरुदेवांसारखे मोठ्या मनाचे गुरु आम्हाला लाभले.
५. परात्पर गुरु डॉक्टरांनी कुटुंबियांची आध्यात्मिक प्रगती करवून घेणे
५ अ. साधिकेची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होणे : मी पूर्ण वेळ आश्रमात रहाण्यासाठी आल्यानंतर ३ मासांतच, म्हणजेच गुरुपौर्णिमा २०१२ या दिवशी माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित केले गेले.
५ आ. यजमानांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होणे : वर्ष २०१७ मध्ये ‘माझ्या यजमानांची पातळी कधी घोषित करणार ?’, असे मला वाटत होते. त्यामुळे मी पू. (सौ.) अश्विनी पवार यांना म्हणाले, ‘‘ताई, आजोबांना (माझ्या यजमानांना) काहीतरी उपाय सांग.’’ त्यांनी माझ्या यजमानांना ३ घंटे नामजप करण्यास सांगितले. त्यांनी मन लावून नामजप पूर्ण केला. त्यानंतर ६ मासांतच, म्हणजे वर्ष २०१८ मध्ये त्यांचीसुद्धा जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटका झाली. (श्री. जाधवआजोबा (वय ८१ वर्षे) यांची सध्याची आध्यत्मिक पातळी ६५ टक्के आहे.)
५ इ. मुलगी श्रीमती भारती गलांडे यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होणे : माझ्या मुलीलासुद्धा साधनेची तळमळ लागली. तिची तळमळ गुरुदेवांपर्यंत पोचली. तिचीही आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित झाले. आमच्या आधीच तिची पातळी घोषित झाली होती.
६. कृतज्ञता
‘परात्पर गुरुदेव, तुम्ही आम्हा तिघांनाही जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सोडवले आहे’, यासाठी तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती थोडीच आहे. परात्पर गुरुमाऊलींनी आम्हाला त्यांच्या आश्रमात ठेवून सर्व सुखसोयी दिल्या. आश्रमात आम्हाला समाधान आणि शांती मिळाली. मागील ५० वर्षांत मी कधी लेखणी हातात घेतली नाही. गुरुदेवांच्या आश्रमात येऊन हातात लेखणी घेऊन त्यांनी हे सर्व लिहून घेतले, याचे मला आश्चर्य वाटते. त्यांच्याच कृपेने मी माझ्या जीवनातील साधनेचा प्रवास लिहू शकले.
७. प्रार्थना
‘परात्पर गुरुदेव, आता माझ्या मनात कसलीच अपेक्षा नाही. भरल्या कपाळाने मला जायचे आहे. मला गोलोकधामला सोडावे. आपल्या चरणी माझी कळकळीची प्रार्थना आहे, ‘शेवटचा दिस गोड व्हावा.’
दुख में तडपे नहीं । सुख में फूले नहीं ।
प्राण जाय पर धर्म भूले नहीं ।
धर्म धन का खजाना लुटाते चलो ।
कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो ।।’
– सौ. सुलोचना नेताजी जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जून २०२०)