पू. तनुजा ठाकूर आणि त्यांचे शिष्य श्री. ब्रिज अरोडा यांची कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘२७.९.२०२१ या दिवशी आम्हा काही साधकांना एका संतांचा सत्संग मिळाला. या सत्संगाला पू. तनुजा ठाकूर आणि त्यांचे शिष्य श्री. ब्रिज अरोडा हे उपस्थित होते. देवाच्या कृपेने माझ्याकडून त्यांच्या संदर्भात झालेले सूक्ष्म परीक्षण आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

पू. तनुजा ठाकूर

पू. तनुजा ठाकूर

१. पू. तनुजा ठाकूर यांच्यातील विविध गुण

पू. तनुजा यांच्यामध्ये मुळात भाव, तळमळ, जिज्ञासा, शिकण्याची वृत्ती, प्रेमभाव, विनम्रता, गुणग्राहकता, नेतृत्व, सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती श्रद्धा अन् कृतज्ञताभाव हे गुण आहेत.

२. पू. तनुजा यांच्यामध्ये ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांचा सुरेख संगम असणे

पू. तनुजा यांच्यामध्ये ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांचा सुरेख संगम झाल्याचे जाणवते.

२ अ. पू. तनुजा यांच्यातील ज्ञानयोगाचे वैशिष्ट्य : पू. तनुजा यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात जिज्ञासा आहे. ज्ञानयोगामुळे त्यांना विविध विषयांचे सखोल ज्ञान आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये संशोधक वृत्तीही असल्यामुळे त्या त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानानुसार विविध प्रयोग करून पहातात. त्यामुळे त्यांच्याकडे विविध विषयांवरचे प्रायोगिक स्तरावरील ज्ञानही पुष्कळ प्रमाणात आहे.

२ आ. पू. तनुजा यांच्यातील कर्मयोगाचे वैशिष्ट्य : कर्मयोगामुळे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग प्रायोगिक स्तरावर करण्याविषयी त्यांचे चिंतन झाल्यामुळे त्यांच्याकडे तात्त्विक ज्ञानासह प्रायोगिक स्तरावरील ज्ञानही पुष्कळ प्रमाणात आहे. त्यांना ज्ञान प्राप्त करण्यासह ज्ञानानुसार आचरण करण्याची तळमळ पुष्कळ प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांचा कर्मयोग ज्ञानयोगामुळे ‘परिपूर्ण कर्मयोग’ झालेला आहे.

२ इ. पू. तनुजा यांच्यातील भक्तीयोगाचे वैशिष्ट्य : भक्तीयोगामुळे ‘सर्वकाही परात्पर गुरु किंवा भगवंत त्यांच्या माध्यमातून करवून घेत आहे’, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये ‘सूक्ष्म कर्तेपणा’ जाणवत नाही. त्या त्यांच्याकडून होणारी साधना आणि कार्य यांचे संपूर्ण श्रेय भगवंताच्या चरणी सहजतेने अर्पण करतात. त्यामुळे त्यांच्या सहवासात भाव जाणवतो. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये इतरांविषयी पुष्कळ प्रीती आहे. प्रीतीमुळे त्या इतरांना आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करून पुष्कळ साहाय्य करतात. त्यांच्यामध्ये इतकी सहजता, प्रीती आणि विनम्रता आहे की, त्या सहजतेने अनोळखी व्यक्तींशी जवळीक साधतात. त्यांच्या प्रीतीमुळे अनोळखी लोकही त्यांच्याकडे आकृष्ट होऊन त्यांनी सांगितलेली साधना करतात.

३. भक्तीयोगामुळे व्यष्टी आणि ज्ञानयोगामुळे समष्टी या दोन्ही स्तरांवर लाभ होणे

पू. तनुजा यांनी गेल्या जन्मी भक्तीयोगानुसार गोपींप्रमाणे गोपीभक्ती केली होती. या जन्मी त्यांची ज्ञानयोगानुसार साधना चालू असून त्या ज्ञानगोपींप्रमाणे भक्ती करत आहेत. त्यामुळे पू. तनुजा यांच्या भक्तांना भक्तीयोगाच्या साधनेमुळे व्यष्टी आणि ज्ञानयोगाच्या साधनेमुळे समष्टी अशा दोन्ही स्तरांवर लाभ होत आहे.

४. पू. तनुजा यांच्याकडून देश-विदेशात धर्म आणि अध्यात्म यांचा प्रसार पुष्कळ प्रमाणात होणार असणे

बहुतांश संतांची प्रकृती व्यष्टी स्तराची असते; परंतु पू. तनुजा यांची प्रकृती समष्टी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून धर्म आणि अध्यात्म यांच्याविषयी समष्टी स्तरावर पुष्कळ प्रमाणात प्रसार होत आहे. त्यांच्यातील ‘तीव्र तळमळ’ या गुणामुळे त्यांच्यावर श्रीगुरुकृपेचा वर्षाव होऊन त्यांच्याकडून संपूर्ण विश्वात धर्म आणि अध्यात्म यांच्या प्रसाराचे मोठे कार्य होणार आहे. त्यामुळे देश-विदेशातील अनेक जिज्ञासू साधना करून आध्यात्मिक उन्नती करणार आहेत. त्यांच्यामध्ये व्यष्टी साधना करून संत आणि सद्गुरुपद प्राप्त करण्याची आणि समष्टी साधना करून समाजात धर्म अन् अध्यात्म यांचा प्रसार करून अनेकांना साधनेला लावण्याची पुष्कळ क्षमता आहे.

श्री. ब्रिज अरोडा

श्री. ब्रिज अरोडा

त्यांना वाईट शक्तींचा त्रास नाही. त्यांच्यावर आश्रमात येण्यापूर्वी थोडे आवरण होते; परंतु आता आश्रमात वास्तव्य केल्यामुळे हे आवरण निघून गेले आहे. आश्रमातील चैतन्य आणि संतांच्या अनमोल मार्गदर्शनाच्या चैतन्यामुळे त्यांचा तोंडवळा उजळला आहे आणि त्यांच्या साधनेची गती वाढली आहे. ते साधनेत पुष्कळ प्रगती करून संतपद प्राप्त करू शकतात. यांच्यामध्ये पुष्कळ साधकत्व आणि विनम्रता आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यात शिष्यभाव आहे. त्यांची वृत्ती पुष्कळ अंतर्मुख आहे. ते मितभाषी असून त्यांची शिकण्याची वृत्ती आणि तळमळ पुष्कळ आहे. त्यांची मूळ प्रकृती व्यष्टी साधना करण्याची आहे; परंतु ते समष्टी साधना शिकत आहेत. परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे त्यांच्यामध्ये समष्टी साधना करण्याची तळमळ आणि जिज्ञासा जागृत होऊन समष्टी साधना करण्याची सुप्त क्षमता जागृत होत आहे. त्यामुळे ते आध्यात्मिक प्रगती करून धर्म आणि अध्यात्म यांचा प्रसार करून समष्टी साधनाही चांगल्या प्रकारे करू शकतील.

कृतज्ञता

‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे पू. तनुजाताई आणि त्यांचे शिष्य यांचे सूक्ष्मातून अवलोकन करून त्यांच्याकडून शिकता आले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.९.२०२१)

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.