वर्ष २०५० पर्यंत ५०० कोटी लोकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल ! –  संयुक्त राष्ट्रांची चेतावणी

पृथ्वीवरील केवळ ०.५ टक्के पाणी वापरण्यायोग्य

‘तिसरे महायुद्ध पाण्यावरून होईल’, असे यापूर्वीच म्हटले गेले आहे. तेच ही चेतावणी सांगत आहे. विज्ञानाने गेल्या १०० – १५० वर्षांत पृथ्वीची अशी दयनीय स्थिती करून टाकली आहे, याविषयी विज्ञानवाद्यांना लाज वाटली पाहिजे ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

न्यूयॉर्क (अमेरिका) – जागतिक स्तरावर ५०० कोटींहून अधिक लोकांना वर्ष २०५० पर्यंत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. ‘हवामानातील पालटामुळे पूर आणि दुष्काळ यांसारख्या पाण्याशी संबंधित धोक्यांचा जागतिक धोका वाढत आहे, तसेच पाणीटंचाईची झळ बसणार्‍या लोकांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.

‘द स्टेट ऑफ क्लायमेट सर्व्हिसेस २०२० : वॉटर’ नावाच्या अहवालातील  आकडेवारीनुसार वर्ष २०१८ मध्ये ३६० कोटी लोकांना प्रतिवर्षी किमान एक मास तरी पाणी अपूर्ण प्रमाणात उपलब्ध होते. २०५० पर्यंत हे प्रमाण ५०० कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. या अहवालात पाण्याचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता प्रतिपादित करण्यात आली आहे. यासह शाश्‍वत विकास आणि हवामान पालट यांच्याशी जुळवून घेणे आवश्यक असल्याचेही म्हटल आहे. पृथ्वीवरील केवळ ०.५ टक्के पाणी वापरण्यायोग्य असल्यामुळे परिस्थिती बिकट होत आहे.