नोंद
सध्या सोयोबीनचा बाजारातील दर आभाळाला गवसणी घालत आहे. त्यामुळे खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात सोयाबीनची विक्रमी पेरणी करण्यात आली आहे. या हंगामात सोयाबीन पेरणी क्षेत्र वाढल्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक हातभार लाभेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. नुकताच झालेला महापूर, अतीवृष्टी, भूस्खलन यांमुळे शेतजमिनींची हानी झाली. असे असतांना अद्याप नेहमीप्रमाणे काही ठिकाणी शासकीय अर्थसाहाय्य पोचू शकलेले नाही, ही शोकांतिका आहे. तसेच एकामागोमाग येणारी संकटे पहाता शेतकर्यांना एव्हाना शासनाकडून समाधानकारक साहाय्य मिळणे अपेक्षित होते; परंतु असे झाले नाही, हे दुर्दैवी आहे.
अशा स्थितीमध्ये शेतकर्यानेच स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच दसरा आणि दिवाळी हे मुख्य सण डोळ्यांपुढे ठेवून सोयाबीन लागवडीला प्राधान्य दिले. गत ८-१० वर्षांपासून सोयाबीनच्या क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ होत ते आता खरीप हंगामातील प्रमुख पीक झाले आहे. इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनसाठी अल्प कष्ट आणि तात्काळ विक्री असे तंत्र शेतकरी बांधव आत्मसात् करू लागले आहेत.
शेतकर्यांनी जरी उपाययोजना काढलेली असली तरी बोगस (खोटी) बियाणे, बियाणांचा तुटवडा, बियाणे वाटपातील सावळा गोंधळ या समस्या शेतकर्यांना आताही भेडसावत आहेत. या सर्व समस्यांवर मात करून सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांनी बियाणांचा तुटवडा असूनही मिळेल तेथून सोयाबीनची उपलब्धता करत पेरणी केली आहे.
गत काही मासातील आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे इतिहासात प्रथमच सोयाबीनचा दर १० सहस्र रुपये क्विंटलच्यावर गेला आहे. यामुळेच सोयाबीनची लागवड वाढल्याचे तज्ञ सांगत आहेत; मात्र कोणतीही नैसर्गिक आपत्ती न ओढावल्यास शेतकरी बांधवांना दसरा-दिवाळीमध्ये सोयाबीनचा चांगला ‘आर्थिक’ हातभार लागेल, हे निश्चित !
वरील सर्व स्थिती पाहिल्यास सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांनी अडचणीवर मात करून स्वतःची स्थिती सुधारण्यासाठी केलेली उपाययोजना सर्वांनाच दिलासा देणारी आहे. अशाप्रकारे सर्वच शेतकर्यांनी हताश होऊन आत्महत्येचा मार्ग न अवलंबता समस्येवर उपाययोजना काढण्यासाठी प्रयत्न करावेत.
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा