किल्ले विशाळगड येथे झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात लढा देणार्‍या हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी देणार्‍या लोकांवर कारवाई करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना कोल्हापूर यांचे जिल्हा प्रशासनास निवेदन

उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, ४ ऑक्टेबर (वार्ता.) – ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृतीच्या समिती’ने चालू केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने तेथील अवैध बांधकामे करणार्‍यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत आहेत. असे झाल्यामुळे तेथील अतिक्रमणधारक आणि अवैध धंदे करणार्‍यांनी त्यांच्यावर कारवाई होईल या भीतीपोटी, शाहूवाडी तालुक्यात अतिक्रमणधारकांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या आंदोलकांच्या विरोधात मलीक रेहान दर्ग्याची अपकीर्ती करत असल्याच्या आणि हिंदु-मुस्लीम वाद निर्माण करत असल्याच्या खोट्या तक्रारी केल्या आहेत. आंदोलकांनी आतापर्यंत केलेल्या कोणत्याही आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. त्यामुळे किल्ले विशाळगड येथे झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात लढा देणार्‍या हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी देणार्‍या लोकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेले हे निवेदन उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी स्वीकारले. हेच निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयातही देण्यात आले.

उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर (उजवीकडे) यांच्याशी चर्चा करतांना हिंदुत्वनिष्ठ

या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, युवा सेना करवीर तालुकाप्रमुख श्री. संतोष (भाऊ) चौगुले, हिंदू एकताचे श्री. बाबा वाघापूरकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. मधुकर नाझरे, ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती’चे श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.

निवेदनात करण्यात आलेल्या अन्य मागण्या

१. शासनाने तात्काळ सर्वेक्षण करून बाहेरून येऊन गडावर रहाणार्‍यांना तात्काळ निष्कासीत करावे.

२. गडावर वास्तव्य करणार्‍या प्रत्येकाचे आधारकार्ड आणि ओळखपत्र पडताळले जावे.

३. अतिक्रमणधारक आणि अवैध धंदे करणार्‍यांवर कठोर कारवाई करून अतिक्रमणे हटवली जावीत.

४. आंदोलकांच्या विरोधात खोट्या तक्रारी करणाऱ्या जवळजवळ सर्वांनीच अल्प-अधिक प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मुख्य विषयाला बगल देऊन हे लोक जातीय तेढ निर्माण करण्याचा आणि हिंदु-मुसलमान वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा लोकांवर शासनाने कठोर कारवाई करावी, तसेच शाहूवाडी तालुक्यामध्ये कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार्‍यांना संरक्षण द्यावे.