देवबाग येथील कर्ली खाडीत अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्‍या ५१ जणांवर गुन्हा नोंद

निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने देवबागवासियांनी अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्‍या ४ होड्या पकडल्यानंतर पोलिसांकडून कारवाई !

निवेदन देऊनही अवैध व्यवसायांच्या विरोधात कारवाई न करणारे पोलीस काय कामाचे ?

पोलिसांना व्यावसायिकांकडून लाच मिळत असल्याने ते कारवाई करत नाहीत, असे वाटल्यास चूक ठरू नये !

प्रतिकात्मक छायाचित्र

मालवण – तालुक्यातील देवबाग येथील कर्ली खाडीत अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्‍या एकूण ५१ जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या वेळी पोलिसांनी ४ होड्या, २३ ब्रास वाळू, तसेच वाळू उपसा करण्यासाठी लागणारे साहित्य कह्यात घेतले. गुन्हा नोंद केलेल्या ५१ पैकी ४८ परप्रांतीय कामगारांची जामिनावर सुटका करण्यात आली, तर होड्यांच्या ३ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार गेले काही मास कर्ली खाडीत अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. याच्या विरोधात देवबाग येथील ग्रामस्थांनी ८ दिवसांपूर्वी महसूल प्रशासनाकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती; मात्र तरीही कोणतीही कारवाई न झाल्याने वाळूचा अवैध उपसा चालू होता. त्यामुळे संतप्त झालेल्या देवबागवासियांनी

२ ऑक्टोबरला पहाटे कर्ली खाडीत वाळूचा उपसा करणार्‍या४ होड्या पकडल्या. याविषयी माहिती मिळाल्यानंतर मालवणचे मंडल अधिकारी पीटर लोबो यांनी वाळूचा उपसा करणार्‍यांच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी होड्यांचे मालक सागर परब, मुकेश सारंग, लीलाधर खोत या तिघांसह एकूण ५१ जणांच्या विरोधात कारवाई केली. यातील ४८ जणांना २ ऑक्टोबरला न्यायालयात उपस्थित केल्यावर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.