राष्ट्रीय भगवा हिंदू वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीची पोलिसांकडून नोंद !
नागरिकांना माहिती मिळते ती न मिळणारे पोलीस !
मडगाव, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – मंगळवार, २८ सप्टेंबर २०२१ या दिवशी सकाळी ९.१५ वाजता राय येथील चर्चजवळ एम्.एच्.२४ ए.यू. ७४०० क्रमांकाच्या वाहनातून महाराष्ट्रातून अवैधपणे आणण्यात आलेला एक बैल मायणा पोलिसांनी कह्यात घेतला. महाराष्ट्रात लातूर येथे रहाणारा या वाहनाचा चालक देवीदास कोल्हे याच्याकडे सोलापूर येथून बैलाला गोव्यात आणण्याविषयीची कागदपत्रे उपलब्ध नव्हती. बैलाची अवैधपणे वाहतूक होत आहे, ही माहिती ध्यान फांऊडेशनने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस खात्यातील वारीक या अधिकार्याने त्वरित वाहन कह्यात घेऊन मायणा कुडतरी पोलीस ठाण्यात नेले. बैलाची अवैधपणे वाहतूक करून त्याची हत्या करण्यासाठी गोव्यात आणले गेले आहे, अशा आशयाची तक्रार राष्ट्रीय भगवा हिंदू वाहिनीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव झा यांनी मायणा कुडतरी पोलीस ठाण्यात केली आहे. यामध्ये ‘प्रिव्हेंशन टू क्रूएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट १९६०’ यातील नियम ४७ ते ५७ यानुसार जनावरांची वाहतूक करण्यासंबंधी नियमांचा भंग करण्यात आला आहे. तसेच जनावरांची हत्या करण्यासंबंधी ‘काऊ स्लॉटर ॲक्ट १९७८’ या कायद्याचा भंग होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी जांबावली येथील ध्यान फाऊंडेशनकडून चालवण्यात येणार्या गोशाळेत या बैलाची रवानगी केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार या बैलाविषयी विचारणा करण्यासाठी बॅनी नावाची एक व्यक्ती मायणा कुडतरी पोलीस ठाण्यात गेली होती. मी शेतात नांगरणी करण्यासाठी १ लाख २० सहस्र रुपये देऊन सोलापूरहून बैल खरेदी केला होता, असा दावा त्याने केला आहे.
ध्यान फाऊंडेशनच्या गोशाळेत अनुमतीविना घुसून २ व्यक्तींकडून तेथील कर्मचार्यांना धमकी
ध्यान फाऊंडेशनमध्ये बैलाला ठेवल्यावर तेथील गोशाळेत २ व्यक्ती अनुमती न घेता घुसल्या आणि ‘या बैलाला आम्ही ५ ऑक्टोबरला येथून घेऊन जाऊ’, अशी धमकी त्यांनी तेथील कर्मचार्यांना दिली. (यावरून अवैधरित्या गोमांसाचा व्यवहार करणारे किती गुंड प्रवृत्तीचे आहेत, ते दिसून येते ! पोलिसांनी अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक) या २ व्यक्तींच्या विरोधात ध्यान फाऊंडेशनने ‘अनुमती न घेता आत येणे, तसेच धमकी देणे’ याविषयीची तक्रार केपे पोलीस ठाण्यात केली आहे. गोव्यात हत्या करण्यासाठी किंवा बैलांच्या झुंजी आयोजित करण्यासाठी अवैधपणे बैलांची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. बैलांच्या झुंजीमध्ये जेव्हा एखादा बैल घायाळ होतो, तेव्हा तो कसायांना विकला जातो आणि त्यानंतर मांस मिळवण्यासाठी अवैधपणे त्याची हत्या करण्यात येते.