७ संशयित दरोडेखोरांना अटक
सोलापूर, ३ ऑक्टोबर – वडाळा येथील पेट्रोलपंप चालक डॉ. अनिल कुलकर्णी यांचे अपहरण करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली, तसेच पुणे येथे नेऊन त्यांच्याकडून ५ लाख ८८ सहस्र रुपयांची रोख रक्कम लुटली. या प्रकरणी सोलापूर ग्रामीणच्या गुन्हे शाखेने ७ जणांच्या टोळीला अटक केली आहे.
१. डॉ. अनिल कुलकर्णी यांचा वडाळा (तालुका उत्तर सोलापूर) येथे चिकित्सालय आणि पेट्रोलपंप आहे. २१ सप्टेंबरच्या रात्री डॉ. कुलकर्णी ५ लाख ८८ सहस्र रुपयांची रोख रक्कम घेऊन चारचाकी वाहनाने सोलापूरकडे परतत असतांना दरोडेखोरांनी रोख रक्कम लुटून त्यांना वाहनातून ढकलून दिले होते.
२. या प्रकरणी विकास बनसोडे, सिद्धार्थ सोनवणे, रामचंद्र कांबळे, वैभव कांबळे, भारत गायकवाड आणि मुराद हनीफ शेख, अशी दरोडेखोरांची नावे आहेत. यातील तीनजण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर सशस्त्र दरोडे, अपहरण, हत्या आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, तर दोघेजण ७ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा भोगून आले आहेत. (गुन्हेगार शिक्षा भोगून येऊन पुन्हा अट्टल गुन्हेगारच बनत आहेत, हे दुर्दैवी आहे. ही स्थिती पालटण्यासाठी गुन्हेगारांना कारागृहात धर्मशिक्षण देऊन साधना करून घेणे आवश्यक आहे. – संपादक)