यात्रा रहित; दर्शनासाठी कडक नियम !
नाशिक – ‘जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची सिद्धता मोठ्या उत्साहात चालू झाली आहे. या काळात वणी येथील सप्तश्रृंगी मंदिरही खुले रहाणार आहे; मात्र भाविकांना पासविना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ६५ वर्षांवरील आणि आजारी व्यक्ती, गर्भवती महिला अन् लहान मुले यांनी या काळात गडावर येऊ नये’, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा ७२ घंट्यांपूर्वी केलेल्या कोरोनाच्या चाचणीचा अहवाल बंधनकारक आहे. नवरात्रीच्या काळात नांदुरी किंवा सप्तश्रृंगी गडावर यात्रा भरवण्यास बंदी असेल. नांदुरी येथून जाण्यासाठी ‘एस्.टी.’ची व्यवस्था करण्यात आली आहे.
नियमावली पुढीलप्रमाणे…!
१. नवरात्रोत्सवाच्या काळात, तसेच कोजागरी पौर्णिमेला म्हणजे १८ आणि १९ ऑक्टोबर या दिवशी खासगी वाहनांना गडावर येण्यास बंदी रहाणार आहे.
२. ‘एस.टी.’मध्ये ५० टक्के प्रवासी बसवून वाहतूक चालू राहील.
३. नांदुरी येथील बुथवरून ‘ऑनलाईन पास’ शक्य असेल तरच मिळेल.
४. पायी दर्शन करण्यासाठी १२ ठिकाणांहून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमानुसार या काळात ‘फेनिक्युलर ट्रॉली’ (गडावरून भाविकांची वाहतूक करणारी वेगळ्या स्वरूपाची ट्रेन) चालू रहाणार आहे. ‘फेनिक्युलर’मधील भाविकांना ३० टक्के, तर पायरीचे दर्शन घेणार्या भाविकांना ७० टक्के प्राधान्य दिले जाणार आहे.