२ ऑक्टोबर २०२१ या दिवशी लालबहादुर शास्त्री यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री म्हणजे साधेपणा आणि महानतेची प्रतिकृती होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत. ते देशाचे पंतप्रधान असतांनाची गोष्ट आहे. एके दिवशी ते कापड गिरणी पहाण्यासाठी गेले. त्यांच्याबरोबर गिरणीचा मालक, उच्च अधिकारी आणि इतर महत्त्वाचे लोक होते. गिरणी पाहिल्यानंतर शास्त्रीजी गिरणीच्या गोदामात गेल्यानंतर त्यांनी साड्या दाखवायला सांगितल्या. गिरणी मालक आणि अधिकार्याने एकापेक्षा एक सुंदर साड्या त्यांना दाखवल्या. शास्त्रीजी साड्या पाहून म्हणाले, ‘साड्या तर पुष्कळ सुंदर आहेत, यांची किंमत काय आहे ?’
गिरणी मालकाने सांगितले, ‘ही साडी ८०० रुपयांची आहे आणि दुसर्या साडीची किंमत १ सहस्र रुपये आहे.’ यावर शास्त्रीजी म्हणाले, ‘ही तर पुष्कळ महाग आहे. मला कमी किमतीच्या साड्या दाखवा.’ येथे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, ही घटना वर्ष १९६५ ची होती, त्या वेळी १ सहस्र रुपयांची किंमत पुष्कळ होती.
गिरणी मालक दुसर्या साड्या दाखवत म्हणाला, ‘बरं, ही पहा. ही साडी ५०० रुपयांची आहे आणि ही ४०० रुपयांची.’ ‘अरे बाबा, यादेखील पुष्कळ महाग आहेत. माझ्यासारख्या गरिबासाठी अल्प किमतीच्या साड्या दाखवा, ज्या मी खरेदी करू शकेन’, असे शास्त्रीजी म्हणाले. ‘वा सरकार, आपण तर आमचे पंतप्रधान आहात, तुम्हाला गरीब कसे म्हणता येईल ? आम्ही तर या साड्या तुम्हाला भेट देत आहोत’, असे गिरणी मालक बोलला.
यावर शास्त्रीजी म्हणाले, ‘नाही बाबा, मी भेट घेऊ शकत नाही.’ यावर तो गिरणी मालक अधिकाराने म्हणाला की, आम्ही आमच्या पंतप्रधानांना भेट देणे, हा आमचा अधिकार आहे. ‘हो, मी पंतप्रधान आहे; परंतु याचा अर्थ असा नाही की, ज्या वस्तू मी खरेदी करू शकत नाही, त्या वस्तू मी भेट म्हणून स्वीकारू आणि आपल्या पत्नीला देऊ. मी पंतप्रधान असलो तरी आहे गरीबच ना ! तुम्ही मला स्वस्त साड्याच दाखवा. मी ऐपतीप्रमाणेच साडी खरेदी करीन’, असे शास्त्रीजी शांतपणे म्हणाले.
गिरणी मालकाच्या सार्या विनवण्या व्यर्थ गेल्या. देशाच्या पंतप्रधानांनी स्वस्त भावाच्या साड्याच खरेदी केल्या. शास्त्रीजी एवढे महान होते की, मोह त्यांना स्पर्शही करू शकत नव्हता. (असे किती लोकप्रतिनिधी आज आढळतात ? – संपादक)
(संदर्भ : ‘बालसंस्कार’ संकेतस्थळ)