सांगली, ३० सप्टेंबर – मिरज शहरात गणेशोत्सव कालावधीत वर्ष २००९ मध्ये जातीय दंगल उसळली होती. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे नोंद झाले होते. सांगली येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचा खटला चालू होता. हा खटला विसर्जित करण्यात यावा, या मागणीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून २ मासांपूर्वी न्यायालयात आवेदन प्रविष्ट करण्यात आले होते. सरकारच्या मागणीनुसार न्यायालयाने हा खटला निकाली काढत १०६ जणांची निर्दाेष मुक्तता केली. यातील प्रमुख संशयितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, मिरज शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांचा समावेश आहे.
दंगलप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, मकरंद देशपांडे यांच्यासह अन्य काही जणांवरील गुन्हे या पूर्वीच वर्ष २०१७ मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेना युती शासनाने मागे घेतले आहेत.