पुणे येथे २ पोलिसांच्या अंगावर रिक्शा घालून त्यांना घायाळ करत चोराचे पलायन !

गुन्हेगारांना कायद्याचा धाकच राहिला नसल्याने गुन्हेगारांचा उद्दामपणा वाढत चालला आहे. स्वतःच्या रक्षणासाठी सतर्कता नसणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक 

पुणे, ३० सप्टेंबर – धानोरीतील गोकुळनगर भाजी मंडईमागे चोर रिक्शा चोरून नेत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चोराने पोलीस मार्शल दीपक राजमाने यांच्या अंगावर रिक्शा घालून त्यांना घायाळ केले आणि तो रिक्शासह पळून गेला. राजमाने यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस नाईक गणेश शिरसाट यांनी मोटारसायकलवरून त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; परंतु रिक्शाचालकाने मोटारसायकलला धडक देऊन शिरसाट यांनाही घायाळ केले. या प्रकरणी गणेश शिरसाट यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रिक्शा मिळाली असून चोराचा शोध घेत आहोत, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांनी दिली.