‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांचे वडील श्री. प्रभाकर पिंगळेआजोबा काही दिवस रुग्णालयात होते. तेव्हा त्यांच्या सेवेत असतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि या सेवेमुळे मला झालेले लाभ यांविषयी येथे दिले आहे.
१. पिंगळेआजोबांची सेवा करतांना स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांची झालेली जाणीव !
१ अ. ‘स्वतःत पुष्कळ भावनाशीलता आहे’, याची जाणीव होणे : मी पहिल्यांदा पिंगळेआजोबांना रुग्णालयात घेऊन गेल्यावर आपत्कालीन कक्षात (‘इमर्जन्सी वॉर्ड’मध्ये) थांबलो होतो. तेव्हा तिथे नुकताच अपघात झालेल्या एका मुलाला भरती केले होते. तो वेदनेने विव्हळत होता. त्याचे विव्हळणे ऐकून माझ्या छातीची धडधड वाढली. तेव्हा ‘याविषयी मी अजूनही फार भावनिक आहे’, याची मला जाणीव झाली.
१ आ. परिस्थिती स्वीकारण्यासाठी मनाचा संघर्ष होणे, नंतर हळूहळू परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने स्थिर रहाता येणे
१ आ १. पिंगळेआजोबांच्या समवेत रुग्णालयात रहाण्याचा कालावधी वाढल्यावर मनाचा संघर्ष होणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने स्वयंसूचना घेण्यास सुचणे, त्यानंतर आश्रमात जाण्याचे विचार न्यून होऊन सेवेची आवड निर्माण होणे : आरंभी मी केवळ २ दिवस पिंगळेआजोबांच्या समवेत रुग्णालयात रहाणार होतो. नंतर काही कारणांनी पिंगळेआजोबांचे होणारे शस्त्रकर्म लांबले आणि त्यामुळे माझा रुग्णालयात रहाण्याचा कालावधी वाढला. तेव्हा प्रतिदिन ‘मला आज आश्रमात परत जाता येईल’, असे वाटायचे; पण तसे होत नसल्याने माझ्या मनाचा संघर्ष होऊन मी अस्थिर होत असे. त्यामुळे माझ्याकडून पिंगळेआजोबांची सेवा मनापासून होत नसे. गुरुकृपेने हे माझ्या लक्षात आल्यावर मी त्यावर स्वयंसूचना घेतल्या. त्यानंतर माझे आश्रमात जाण्याविषयीचे विचार न्यून झाले आणि मी आजोबांची सेवा आवडीने करू लागलो. मला रात्रभर जागरण व्हायचे, तरी दिवसभर आजोबांची सेवा करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला बळ मिळायचे.
१ आ २. मनात ‘पिंगळेआजोबांनी कौतुक करावे’, अशी अपेक्षा असतांना त्यांनी कौतुक न करणे, त्या वेळी ‘देव अपेक्षाविरहित सेवा करायला शिकवत आहे’, याची जाणीव होणे अन् नामजपासहित सेवा करू लागल्यावर आजोबांच्या तोंडवळ्यावर समाधान दिसणे : माझ्या मनात ‘आजोबांना चांगले पदार्थ खाऊ घालतो, मी त्यांच्याशी प्रेमाने बोलतो’, असे स्वकौतुकाचे विचार असायचे. ‘आजोबांनी मी त्यांच्यासाठी केलेले लक्षात ठेवावे’, असेही मला वाटायचे; पण वयोमानानुसार काही गोष्टी त्यांच्या लक्षात यायच्या नाहीत. ते काही वेळापूर्वी घडलेल्या घटनाही विसरलेले असायचे. त्यामुळे त्यांच्याकडून कौतुकाचे बोल ऐकण्याची माझी इच्छा तशीच रहायची. त्यांनी ‘मला बरे वाटले, असे म्हणावे’, असेही मला सतत वाटायचे; पण त्यांचा काहीच प्रतिसाद नसायचा. काही दिवसांनी ‘देव मला कुठलीही अपेक्षा न ठेवता परिपूर्ण सेवा करायला शिकवत आहे’, याची मला जाणीव झाली. नंतर मी आजोबांना त्यांची सेवा केल्यावर ‘कसे वाटते ?’, असे विचारणे बंद केले. मी नामजप करत सेवा करू लागल्यावर मला त्यांच्या तोंडवळ्यावर समाधान दिसू लागले.
१ आ ३. सेवेमुळे कधी २ – ३ दिवस अंघोळ करता न येणे, तेव्हा सतत तो विचार मनात येणे, त्या वेळी सीमेवरील सैनिकांची आठवण येऊन ‘ते कसे दिवस काढतात ?’, असा विचार येणे, नंतर ‘अंघोळ करता आली नाही’, याविषयी मनात विचार येणे बंद होणे : कधी कधी मला २ – ३ दिवसांनी अंघोळ करायला वेळ मिळायचा. त्या वेळी माझ्या मनात सतत ‘माझी अंघोळ झाली नाही’, हा विचार यायचा. एकदा मला देशाच्या सीमेवरील सैनिकांची आठवण आली. ‘ते किती दिवस अंघोळ न करता रहात असतील ? त्यांच्या मनाची स्थिती काय असेल ?’, ते मी अनुभवले. मग माझ्या मनात विचार आला, ‘मी माझ्या गुरुदेवांचा एक साधक आहे.’ त्यानंतर ‘मला अंघोळ करता आली नाही’, याविषयी मनात विचार येणेही बंद झाले.
१ इ. ‘मी कुठलीही सेवा सहजतेने करू शकतो’, असे मला वाटायचे; परंतु पिंगळेआजोबांची सेवा करतांना माझा हा भ्रम दूर झाला.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘शारीरिक अन् मानसिक क्षमता चांगली असतांनाच लहानपणापासूनच साधना का करायला सांगत आहेत ?’, हे लक्षात येणे
पिंगळेआजोबांचे वय अधिक होते आणि या वयात त्यांना जे भोगावे लागत होते, ते पाहून मला वाटले, ‘गुरुदेवांमुळे मी आतापर्यंत एकही दुःख भोगले नाही. जीवनात काही कटू प्रसंग आले; पण गुरुदेवांच्या कृपेने मला त्यातून सहजतेने बाहेर पडता आले. त्यांनी मला कसलीही झळ पोचू दिली नाही.’ त्यामुळे मला ‘गुरुदेव तरुण वयातच साधना का करायला सांगत आहेत ? आणि त्यावर अधिक भर का देत आहेत ?’, याची तीव्रतेने जाणीव झाली. ‘शारीरिक आणि मानसिक क्षमता चांगली असेपर्यंत साधना सहज करता येईल’, याचे भान गुरुदेवांनी मला करून दिले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर भावप्रयोग सुचणे
आजोबाची सेवा करतांना माझ्याकडून गुरुदेवांना प्रार्थना व्हायची, ‘तुम्हीच माझा प्रत्येक क्षण उपयोगात आणा. मी आजोबांची सेवा करतांना ‘भाव कसा ठेवू ?’, ते तुम्हीच मला सुचवा.’ तेव्हा मला गुरुदेवांनी सुचवलेले काही भावप्रयोग येथे दिले आहेत.
३ अ. गुरुदेवांनी सुचवलेले भावप्रयोग आणि त्याचा झालेला लाभ !
३ अ १. पिंगळेआजोबांना दूध पाजतांना ‘शंकराच्या पिंडीवर अभिषेक करत आहे’, असा भाव ठेवणे, त्यानंतर नामजप करत शांत अन् स्थिर राहून एकाग्रतने सेवा करता येऊ लागणे : आजोबांना दूध पाजतांना ‘मी शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करत आहे’, असा भाव ठेवला. त्यांना दुधाचा प्रत्येक घोट पाजतांना मी ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करू लागलो. मला घाईघाईत सेवा करण्याची सवय आहे; परंतु आजोबांना एक पेला दूध पिण्यासाठी अर्धा घंटा लागायचा. भाव ठेवल्यामुळे माझ्याकडून स्थिर राहून एकाग्रतेने आणि संयमाने सेवा व्हायला लागली. मला त्यातील आनंदही घेता आला.
३ अ २. पिंगळेआजोबांची सेवा करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करत आहे’, असा भाव ठेवल्याने सेवेतून चैतन्य मिळणे : आजोबांचे पाय चेपतांना, त्यांचे कपडे पालटतांना, त्यांची शारीरिक स्वच्छता करतांना मी ‘गुरुदेवांची सेवा करत आहे’, असा भाव ठेवला. तेव्हा आजोबांच्या जागी मला गुरुदेव दिसू लागले. त्यामुळे माझी सेवा आनंदाने व्हायची आणि ‘त्या सेवेतून माझ्या शरिरात चैतन्य जात आहे’, असे मला जाणवायचे.
३ अ ३. आजोबांची सिद्धता करतांना ‘श्रीकृष्णाची सिद्धता करत आहे’, असा भाव ठेवल्यावर माझ्याकडून श्रीकृष्णाच्या नामजपासह सेवा होत होती. ती सेवा ‘श्रीकृष्णाला आवडावी’, या भावाने माझा सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न व्हायचा.
३ अ ४. आजोबांना पाणी पाजतांना मी ‘त्यांना गुरुदेवांचे चरणतीर्थ देत आहे’, असा भाव ठेवायचो. त्या वेळी माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप व्हायचा.
४. श्री. पिंगळेआजोबांच्या सेवेतून शिकायला मिळालेली अन्य सूत्रे
अ. ‘पलंगावर झोपलेल्या रुग्णाला न उठवता पलंगावरील चादर कशी पालटायची ?’, ते मला शिकता आले.
आ. रुग्णाला ‘सलाईन’ लावण्यासाठी त्याची शीर मिळाली नाही, तर ‘अजून कुठे ‘सलाईन’ची सुई टोचता येते ?’, हेही अन्य रुग्णांचे बघून मला शिकता आले.
इ. रुग्णाला लावलेली ‘सलाईन’ची बाटली काढल्यावर ‘टोचून ठेवलेल्या सुईतून रक्त बाहेर येऊ नये’, यासाठी रुग्णाचा हात वर करून टोपण लावायला हवे.
ई. प्रथमोपचार प्रशिक्षणामध्ये शिकवल्याप्रमाणे रुग्णाची नाडी तपासण्याचा सरावही मला करता आला.
५. कृतज्ञता
‘आजोबांना कुठल्या स्थितीत ठेवल्यावर त्यांना अधिक आराम मिळेल ?’, हे सर्व मला गुरुदेवांनीच सुचवले. गुरुदेवांनीच माझ्या मनाची सर्व प्रकारे सिद्धता करवून घेतली आणि त्यामुळे मला खरा आनंद अनुभवता आला. ‘येणार्या आपत्काळात कुठल्या गोष्टींना समोरे जावे लागेल ?’, हे आपल्याला ठाऊक नाही. माझी गुरुदेवांवरील श्रद्धा वाढून ‘गुरुदेवांमुळेच सर्वांचे रक्षण होत आहे’, याची मला जाणीव झाली. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !
‘हे गुरुदेव, तुम्ही दिलेली सेवा करतांना माझ्याकडून पुष्कळ चुका झाल्या. तुम्हाला अपेक्षित असा सेवेचा पूर्ण लाभ करून घेण्यात मी न्यून पडलो. यासाठी मी प.पू. गुरुदेव आणि आजोबा यांची क्षमा मागतो.’
– श्री. हेमंत सुरेश पुजारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०२१)