भायखळा कारागृहातील ३९ बंदीवानांना कोरोनाची लागण

गर्भवती महिलेचाही समावेश

मुंबई – मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असतांना भायखळा येथील महिलांच्या कारागृहातील ३९ बंदीवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये ६ मुलांसह एका गर्भवती महिला बंदीवानाचाही समावेश आहे. भायखळा कारागृहातील अनेक बंदीवानांना ताप येत असल्याची माहिती १७ सप्टेंबर या दिवशी स्थानिक आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानंतर महानगरपालिकेकडून कारागृहात शिबीर घेऊन १२० हून अधिक बंदीवानांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ३९ जणींना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. कोरोनाबाधित रुग्णांना माझगाव येथील पाटणवाला नगरपालिकेच्या शाळेत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.