साधिकेला झालेले वाईट शक्तींचे त्रास, आलेल्या अडचणी आणि तिचे त्रासांबद्दल झालेले चिंतन

सौ. अरुणा पोवार

१. प्रतिदिन एक कावळा सतत घराभोवती फिरत असणे, तो जेवणाच्या वेळेत पुष्कळ ओरडणे आणि त्याला दही-भात ठेवल्यावरच तो शांत होणे

‘साधारण ८-९ वर्षांपूर्वी आम्ही रत्नागिरीला रहायला आलो. आम्ही मुलीच्या विवाहासाठी स्थळे पहाणे चालू केले होते. तेव्हापासून प्रतिदिन एक कावळा आमच्या जेवणाच्या वेळी खिडकीत येऊन पुष्कळ ओरडायचा. त्याला दही-भात ठेवल्यावर तो शांत व्हायचा; पण सतत घराभोवतीच फिरत असायचा. मी रत्नागिरी येथील सनातनच्या सेवाकेंद्रात गेले, तर तिथेही एक कावळा येऊन ओरडायचा. काही वेळा मी अंघोळीपूर्वी भात केलेला असेल, तर मी कावळ्यासाठी भात ठेवत नसे. तेव्हा तो आम्ही जेवायला बसतो, तिथल्या खिडकीत बसून ओरडायचा. मग परत त्याच्यासाठी अंघोळीनंतर भात करून ठेवायला लागत असे. असे ३-४ वर्षे चालू होते.

२. कुटुंबियांना पूर्वजांचे त्रास असून करणी केलेली असणे, त्यामुळे घरात कुठलेही कुलाचार न होणे आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप नियमित केल्याने आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात न्यून होणे

आम्हाला पूर्वजांचे त्रास असून आमच्यावर करणीही केलेली आहे. यजमान घरात सर्वांत मोठे असूनही आमच्याकडून कुलधर्म, कुलाचार इत्यादी काहीच होत नाहीत. सण करायचा ठरवले, तर त्या दिवशी घरात पुष्कळ भांडणे होतात. त्यामुळे मी सण करायचे सोडून दिले. घरात प्रत्येकाला आध्यात्मिक त्रास आहे. मी १७ वर्षांपूर्वी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेत आल्यापासून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप नियमित करत आहे आणि मुले लहान असतांना तीही जप करत होती. तेव्हापासून काही प्रमाणात त्रास न्यून झाले आहेत; परंतु आता मुलांना हे पटत नाही; म्हणून मुले नामजप करत नाहीत.

३. पितृपक्षात महालय श्राद्ध करतांना आलेली अनुभूती

एकदा ‘पितृपक्षात महालय श्राद्ध करूया’, असा विचार माझ्या मनात आला. मी त्याविषयी माझ्या यजमानांना विचारले असता ते ‘हो’ म्हणाले. मागील ८ वर्षांपासून आम्ही महालय श्राद्ध करण्यास आरंभ केला. ज्या दिवशी घरी महालय श्राद्ध असायचे, त्या दिवशी मला चैतन्य जाणवून हलके आणि उत्साही वाटायचे. ‘देवच हे सर्व माझ्याकडून करवून घेत आहे’, असे मला जाणवायचे. त्या वेळी मला माझे अस्तित्वच जाणवत नसे. माझ्याकडून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप पुष्कळ आर्ततेने आणि भावपूर्ण व्हायचा. ‘श्राद्धाची सर्व सिद्धता करणे, नेवैद्य वेळेत करणे, ब्राह्मण वेळेत येणे’, हे सर्व अगदी व्यवस्थित व्हायचे. ‘माझा स्वयंपाक (नैवेद्य) होईपर्यंत दत्तगुरु स्वयंपाकघरात उभे आहेत’, असे मला वाटायचे. तेच माझ्याकडून सर्व करवून घेत होते.

‘हे सर्व गुरुमाऊली आणि दत्तगुरु यांच्या कृपेने मला अनुभवता आले’, त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

४. कुटुंबियांना झालेले त्रास

४ अ. कुटुंबियांवर वाईट शक्तींचे आक्रमण होणे, सर्वांना शारीरिक, मानसिक अन् आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणे आणि सर्वांची ताटातूट होऊन एकमेकांचे साहाय्य न मिळणे : या तीन-साडेतीन वर्षांत आमच्या घरातील त्रास अतिशय वाढला. अडीच-तीन वर्षांपूर्वी अकस्मात् आम्हा कुटुंबियांवर म्हणजे मी, माझे पती, मुलगा, सून आणि तिच्या गर्भातील बाळ यांवर वाईट शक्तींचे मोठे आक्रमण झाले. गरोदर असलेल्या सुनेची सोनोग्राफी केली असता ‘बाळामध्ये काहीतरी दोष आहे’, असे जाणवले. त्यासाठी आधुनिक वैद्यांनी गर्भ काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी ती ५-६ मासांची (महिन्यांची) गरोदर होती. तेव्हा मला पूर्वजांचे आत्मे, मोठ्या वाईट शक्ती आणि अन्य वाईट शक्ती दिसत होत्या. आमच्यावर जीवघेणी आक्रमणे होत होती. सर्वांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अडचणी, अपकीर्ती (बदनामी) होणे, आमच्याविषयी खोट्या अफवा पसरणे आणि मानहानीचे प्रसंग यांना तोंड द्यावे लागत होते. यातूनच आम्हा सर्वांची ताटातूट झाली. सर्व जण विखुरले गेल्याने कुणालाच कुणाचे साहाय्य मिळत नव्हते.

४ आ. प्रत्येक वेळी स्वभावदोष आणि अहं वाढल्यावर वाईट शक्तींचे आक्रमण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे ध्यानी येणे, त्या वेळी नेहमीप्रमाणे अनाहतचक्राजवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व न जाणवणे आणि त्रासांना तोंड देण्याविना गत्यंतर नसल्याचे लक्षात येणे : एवढे मोठे आक्रमण होण्याच्या आधी ‘माझ्यातील स्वभावदोष आणि अहं पुष्कळ वाढला आहे’, हे माझ्या ध्यानात येत होते. मला नेहमी माझ्या अनाहतचक्राजवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवायचे. माझे काही चुकले की, लगेच मला त्यांचा सूक्ष्मातून आवाज आतून येत होता. ते मला सूक्ष्मातून मार्गदर्शन करायचे. कधी प.पू. भक्तराज महाराज यांचा आवाज येत असे. त्या वेळी मी तात्पुरती शांत होत असे. या वेळी स्वभावदोष आणि अहं वाढल्यामुळे मोठ्या वाईट शक्तींनी माझा अपलाभ घेऊन आम्हा सर्वांना कह्यात घेतले. एक दिवस मला सूक्ष्मातून ‘माझ्या अनाहतचक्राजवळ परात्पर गुरु डॉक्टर नाहीत’, असे जाणवले. त्यानंतर येईल त्या प्रसंगाना तोंड देण्याविना गत्यंतर नसून माझ्या हातात काहीच उरले नसल्याचे लक्षात आले. ‘माझे साधनेचे प्रयत्न पुष्कळ न्यून पडत आहेत’, हे माझ्या लक्षात आले.

असे असूनही सुनेचा गर्भ काढून न टाकता तो ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सून बाळंतीण झाल्यानंतर बाळ अतिशय सुदृढ आणि छान असल्याचे आढळले. असेच मोठे आक्रमण वर्ष १९९१ आणि १९९२ या वर्षी माझ्यावर झाले होते. त्या वेळीही देवानेच मला वाचवले. ‘त्या वेळीही ते आक्रमण माझ्यातील अहं वाढल्यामुळेच झाले होते’, हे आता लक्षात येते.

५. अकस्मात् एक शस्त्रकर्म करावे लागणे, त्या कालावधीत घरातील विद्युत् उपकरणे (इलेक्ट्रिकल) अकस्मात् बंद पडून नादुरुस्त होणे, नवे कपडेही निस्तेज दिसू लागणे आणि जिवंत रहाण्याची शाश्वती नसणे

अकस्मात् माझी गर्भाची पिशवी काढण्याचे शस्त्रकर्म करावे लागले. माझी प्रकृती पुष्कळ खालावल्यावर मला मुंबईला नेण्यात आले. या वेळी घरातील विद्युत् उपकरणे (इलेक्ट्रीकल), उदा. दूरचित्रवाणी संच (टी.व्ही), वातानुकूलन यंत्र (एसी) आणि धुलाई यंत्र अकस्मात् बंद पडून नादुरुस्त झाले. माझे नवीन कपडे एकदम निस्तेज अन् जुने दिसायला लागले. मी शस्त्रकर्मासाठी घरातून बाहेर पडतांना आणि त्या आधी २-३ दिवस अंगणात कुत्री रडत होती. माझ्या जिवंत रहाण्याचीही शाश्वती उरली नव्हती.

६. बिकट परिस्थितीतही गुरुमाऊली फुलासारखी सांभाळत असल्याचे वाटणे

शस्त्रकर्माच्या दिवशी सकाळीच मला गुरुमाऊली माझ्या स्वप्नात दिसली. त्यानंतर माझे मन आतून एकदम शांत झाले आणि मी स्थिर झाले. त्या वेळी मी गुरुमाऊलींजवळ क्षमायाचना करत होते. ‘गुरुमाऊली माझ्या हृदयात सूक्ष्मातून बसून मला फुलासारखी सांभाळत होती आणि बाहेरच्या त्रासाची झळही पोचू देत नव्हती’, हे आठवून मी त्याच विचारात असायचे.

७. शस्त्रकर्मानंतर वाईट शक्तीचा तीव्र त्रास जाणवणे, घरातल्यांनी सहकार्य न केल्याने त्रास होणे आणि स्वतःलाच सर्व कामे करावी लागल्याने मानसिक त्रास होणे

शस्त्रकर्म झाल्यानंतर ज्या वेळी मला त्या कक्षामधून बाहेर आणून ठेवले, तेव्हा मला वाईट शक्तीचा त्रास जाणवत होता. मला माझे अस्तित्व मुळीच जाणवत नव्हते. ‘गुरुदेव मला सूक्ष्मातून दिसत का नाहीत ? मला त्यांचे सूक्ष्मातून अस्तित्व का जाणवत नाही ? ते मला साहाय्य का करत नाहीत ?’, असे प्रश्न सतत माझ्या मनात येत होते. माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती नाजूक असतांनाही घरातील लोक माझ्याशी अन् आपापसांत माझ्यासमोर भांडण करायचे. जेमतेम एक आठवडा मी एका नातेवाईकांच्या घरी विश्रांती घेतली आणि स्वतः प्रवास करून मुंबईहून रत्नागिरीला आले. तेव्हापासून घरची सगळी कामे मलाच करावी लागली. हे सर्व मला सहन न झाल्यामुळे मला मानसिक त्रास होत असे.

८. त्रासांच्या संदर्भात झालेले चिंतन

मोठ्या वाईट शक्ती प्रथम आपला स्वभावदोष आणि अहं वाढवतात. आरंभी ते आपल्या लक्षात येत नाही. मग ते आपली सात्त्विकता न्यून करतात. आपल्याकडून चुकीचे बोलणे आणि चुकीच्या कृती करवून घेतात अन् शेवटी एकदम आक्रमण करतात. ‘हे त्यांचे पूर्वनियोजनच असते’, असे माझ्या लक्षात आले.

‘हे गुरुमाऊली, माझ्याकडून तूच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करवून घे. हे सर्व करण्यासाठी मी अगदीच असमर्थ आहे. मला अजूनही योग्य आणि अयोग्य कळत नाही. ‘यातून माझी साधना होऊ दे’, अशी तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे. हे सर्व लिहून घेतल्याबद्दल मी तुझ्या कोमल चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. अरुणा पोवार, रत्नागिरी (१३.१.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक