धर्मादाय सहआयुक्तांनी मागितले देवस्थानांच्या भूमींचे तपशील !

  • हिंदूंच्या मंदिरातील पैशांसमवेतच आता भूमी बळकावणे, त्यांची परस्पर विक्री करणे, सातबारा उतार्‍यात फेरफार करण्यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. मंदिरातील पैसा, दागदागिने, देवस्थानच्या भूमी सुरक्षित रहाण्यासाठी आता सर्व भक्तांनी संघटित होऊन यामध्ये लक्ष घातले पाहिजे. – संपादक 
  • मंदिरांच्या संपत्तीविषयी सर्व भक्तांनी सतर्क आणि जागरूक रहाणे आवश्यक आहे ! – संपादक
धर्मादाय सहआयुक्त कार्यालय, पुणे

पुणे – देवस्थानसाठी दिलेल्या भूमीवर हक्क दाखवून त्यांची परस्पर विक्री केल्याच्या अनेक घटना सध्या समोर  येत आहेत. त्यामुळे पुणे विभागातील विविध देवस्थानांच्या भूमींच्या व्यवहाराची माहिती धर्मादाय सहआयुक्तांनी संकलित करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे देवस्थानच्या भूमी परस्पर लाटणार्‍यांना चाप बसणार असून त्यांचे घोटाळे उघडकीस येणार आहेत. गेल्या काही वर्षांत देवस्थानसाठी दिलेल्या भूमी पुजारी किंवा विश्वस्त यांनी गिळंकृत केल्याचे प्रकार समोर आले आहेत. अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून या प्रकाराकडे लक्ष वेधले होते. न्यायालयाने – देवस्थानसाठी दिलेल्या भूमींवर देवस्थानचाच अधिकार राहील. पुजार्‍यांचा कोणत्याही प्रकारचा मालकीहक्क रहाणार नसल्याचे सांगितल्याने धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुके यांनी पुणे विभागातील जिल्हाधिकार्‍यांसह भूसंपादन अधिकार्‍यांकडून माहिती मागवली आहे.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील संबंधित अधिकार्‍यांनी त्यांच्याकडील देवस्थानांच्या भूमींच्या संदर्भात योग्य ते निर्देश द्यावेत, असेही बुके यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. कोणत्याही देवस्थानच्या भूमींची विश्वस्त किंवा पुजारी यांनी परस्पर विक्री केल्यास किंवा त्यात फेरफार केल्याचे आढळल्यास देवस्थानातील दोषींवर महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० मधील तरतुदींअन्वये योग्य कारवाई करण्यासाठी तशी माहिती धर्मादाय सह आयुक्तालयात कळवावी, असेही बुके यांनी स्पष्ट केले.