केक संस्कृतीची पद्धत बंद करण्यासाठी हडपसर (पुणे) येथील शेखर(दादा) मोडक यांची ‘माझा वाढदिवस, माझी गोसेवा’ ही अभिनव संकल्पना !

गोशाळेतील गायी-वासरांना चारा किंवा देणगी स्वरूपातील सेवा देऊन वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन !

हड़पसर (पुणे), २२ सप्टेंबर – केक संस्कृतीची पाश्चात्त्य पद्धत बंद करण्यासाठी येणार्‍या काही दिवसांमध्ये शेखर(दादा) मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘धर्मयोद्धा स्व. रवींद्रनाना मोडक युथ फाऊंडेशन’च्या वतीने ‘माझा वाढदिवस, माझी गोसेवा’ ही संकल्पना हडपसर येथे पुरंदर परिसरात राबवण्यात येणार आहे. (पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे केक कापून, मेणबत्त्या विझवून वाढदिवस साजरा करण्याने कोणताही लाभ होत नाही, उलट हिंदु धर्मशास्त्रानुसार हानीच होते. त्यामुळे केक कापून वाढदिवस साजरा न करता गोशाळेतील गाई आणि वासरे यांना चारा देऊन वाढदिवस साजरा करण्याची मोडक यांची ही संकल्पना खरोखरीच कौतुकास्पद आहे ! त्याचप्रमाणे हिंदु संस्कृतीप्रमाणे तिथीनुसार औक्षण करून वाढदिवस साजरा केल्यास देवतांचे आशीर्वाद मिळून आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो ! – संपादक)

या संकल्पनेविषयी शेखर(दादा) मोडक यांनी सांगितले की, सध्याची कोरोनाची परिस्थिती पहिली, तर निर्बंधांमुळे  गोशाळा मालकांसमोर चारा आणि आर्थिक स्वरूपाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा वेळेस स्वत:चा वाढदिवस केक कापून न करता गायी-वासरे यांच्या समस्या जाणून वाढदिवस साजरा करतांना गो-संवर्धनासाठी कटीबद्ध राहूया. गोमातेचे रक्षण करून ‘गोहत्या मुक्त भारत’ ही संकल्पना अजरामर करूया. स्वत:च्या वाढदिवसाच्या किंवा अन्य मंगल प्रसंगी गोशाळेसाठी आणि गो-संवर्धनासाठी प्रयत्नरत राहूया.

‘सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळे’चे गोरक्षक आणि धर्माभिमानी ऋषिकेश कामथे यांनी सांगितले की, आपणही अशा पद्धतीने स्वत:चा वाढदिवस साजरा करून गोशाळेला साहाय्य करूया.

कामथे हे कृतीशील धर्माभिमानी आहेत. ते हडपसर आणि सासवड भागांत शिववंदनेच्या माध्यमातून तरूणांचे संघटन करतात. गोरक्षणाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात गोवंशियांना कसायांपासून वाचवण्यासाठी सतत कार्यरत असतात. तसेच ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या हिंदु महिला आणि तरुणी यांच्या सुटकेसाठीही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. जे या उपक्रमात सहभागी होण्यास इच्छुक असतील, त्यांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा – ऋषिकेश कामथे ९१३०५४२३१३, रोशन चोरघडे ९६२३६०७३१०