देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे. धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान हे अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. अन्य धर्मियांविषयी अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस प्रशासन दाखवेल का ? हिंदू सहिष्णू असल्यामुळे त्यांना धर्मानुसार आचरण करण्याचाही अधिकार नाही का ? – संपादक
पुणे, २२ सप्टेंबर – गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही घरच्या घरी विसर्जन, मूर्ती संकलन केंद्र आणि फिरते हौद असे ३ पर्याय पुणेकरांना उपलब्ध करून देण्यात आले होते. नागरिकांना विसर्जन घाटावर विसर्जनास बंदी घातली होती. त्यामुळे अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने १ लाख ६ सहस्र मूर्ती पुणेकरांनी मूर्ती संकलन केंद्रांवर दान केल्या. दीड लाख मूर्ती फिरत्या हौदांमध्ये विसर्जित करण्यात आल्या.
महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून २७७ केंद्रांवर ९६ सहस्र २०३ किलो अमोनियम बायकार्बाेनेट वितरित करण्यात आले. (रासायनिक पदार्थ वापरून श्री गणेशमूर्तीचे विघटन करणे, हे विडंबन आहे. आपद्धर्म म्हणून श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कसे करावे ? हेसुद्धा शास्त्रात सांगितले आहे. त्यानुसारही कृती करता येऊ शकते, हे प्रशासन जाणून घेईल का ? – संपादक) घनकचरा व्यवस्थापन विभागाने ६०, नगरसेवकांचे ८४, क्षेत्रीय कार्यालयांनी उपलब्ध करून दिलेले ७३ असे एकूण २१७ फिरते हौद उपलब्ध करून देण्यात आले होते.