२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने पितृपूजनाविषयीचे लिखाण…
१. श्रीविष्णूचे पूजन केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे
१ अ. शंखपूजनाच्या वेळी ‘ॐ’ चा दीर्घ उच्चार केल्यावर जाणवलेले सूत्र : मुख्य पूजनापूर्वी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या शंखपूजन करत असतांना सनातनचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक-पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी दीर्घ ‘ॐ’ चा उच्चार केला. तेव्हा वातावरणात ‘ॐ’ च्या नादातून निर्माण झालेल्या नादपोकळीकडे ब्रह्मांडातील विष्णुतत्त्व आकृष्ट होऊन ते वायूमंडलात कार्यरत झाले. त्यामुळे वायूमंडलाची शुद्धी होऊन वायूमंडल सात्त्विक झाले.
१ आ. पूजेचा संकल्प नारायणस्वरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले हेच पूर्ण करणार असणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ जेव्हा पूजेचा संकल्प करत होत्या, तेव्हा त्यांच्या पाठीमागून स्थुलातून सूर्याचे किरण त्यांच्या जवळ पडले. या किरणांचा आकार गुरुपादुकांप्रमाणे होता. यावरून ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेला पूजेचा संकल्प नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले हेच पूर्ण करणार आहेत आणि त्यांच्या संकल्पामुळे साधकांना परात्पर गुरुदेवांचे कृपाशीर्वाद लाभले आहेत’, असे जाणवले.
१ इ. सूर्यकिरण प्रथम श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या पाठीपासून डोक्यापर्यंत, नंतर श्रीविष्णूच्या चरणांपासून डोक्यापर्यंत आणि शेवटी पितरांसाठी ठेवलेल्या कलशावर पडण्यामागील कार्यकारणभाव
१ इ १. सूर्यकिरण प्रथम श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या पाठीपासून डोक्यापर्यंत पडणे : पृथ्वीवर चालू असलेल्या पितरांसाठीच्या श्रीविष्णूच्या पूजनामुळे प्रसन्न झालेल्या सूर्यलोकात वास करणार्या दिव्य पितरांनी त्यांचे कृपाशीर्वाद सूर्यकिरणांच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवले. दिव्य पितरांचे कृपाशीर्वाद आणि सूर्यनारायणाची कृपा साधकांचे प्रतिनिधित्व करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना प्राप्त झाली. जेव्हा सूर्यकिरण श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या डोक्यावर पडले, तेव्हा त्यांमध्ये ‘ॐ’ चा आकार दिसत होता. यावरून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये ‘ॐ’ काराप्रमाणे दिव्य आणि मंगलकारी दैवी शक्ती कार्यरत असल्याची प्रचीती मिळाली.
१ इ २. सूर्यकिरण श्रीविष्णूच्या चरणांपासून डोक्यापर्यंत पडणे : पितरांना गती देण्यासाठी विष्णुलोकातील विष्णुतत्त्वाच्या लहरी सूर्यकिरणांच्या माध्यमातून पृथ्वीवर आल्या आणि त्या पूजेतील पितळ्याच्या श्रीविष्णूच्या मूर्तीत संक्रमित झाल्या. त्यामुळे संपूर्ण मूर्ती विष्णुतत्त्वाने भारित झाली.
१ इ ३. सूर्यकिरण पितरांसाठी ठेवलेल्या कलशावर पडणे : आपतत्त्व प्रबळ असणारे कनिष्ठ स्तरावरील पितर पितरांसाठी ठेवलेल्या कलशातील जलाकडे आकृष्ट झाले होते आणि वायुतत्त्व प्रबळ असणारे वरिष्ठ स्तरावरील पितर कलशातील पोकळीमध्ये आकृष्ट झाले होते. या पितरांचे शुद्धीकरण करण्यासाठी कलशावर सूर्यकिरण पडले. त्यामुळे पितरांच्या लिंगदेहांची शुद्धी झाली. त्याचप्रमाणे सनातनचे दिवंगत उन्नत साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांच्या लिंगदेहांची तेजोमय स्पंदने सूर्यकिरणांमध्ये मिसळून ती पितरांसाठी ठेवलेल्या कलशामध्ये आकृष्ट झाली.
१ ई. पुरुषसूक्ताच्या वेळी सूर्यकिरण पितृकलशावर पडणे : पुरुषसूक्ताच्या वेळी सूर्यकिरण पितृकलशावर पडले; तेव्हा पितरांना गती आणि मुक्ती देण्यासाठी श्रीविष्णूचे तत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवले.
१ उ. श्रीविष्णू आणि ब्रह्मा यांचे कृपाशीर्वाद मिळणे : श्रीविष्णूचे पूजन झाल्यावर श्रीविष्णुगायत्री मंत्र म्हणून श्रीविष्णूला आणि ब्रह्मगायत्री मंत्र म्हणून ब्रह्मदेवासाठी फूल ताम्हनात अर्पण केले. तेव्हा प्रथम विष्णुतत्त्वे आणि नंतर सर्व पितरांचे मूळपुरुष असणारे ब्रह्मदेवाचे तत्त्व पूजनस्थळी कार्यरत झाले. दोन्ही देवांनी संतुष्ट होऊन पृथ्वीवरील साधकांना आध्यात्मिक उन्नतीचा आणि पितृरूपातील साधकांना मुक्तीचा आशीर्वाद दिला.
१ ऊ. षट्पदी स्तोत्राच्या पठणाचा सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम : जेव्हा श्री. दामोदर वझे यांनी षट्पदी स्तोत्राचे पठण केले, तेव्हा वातावरणात श्रीविष्णूची आनंददायी शक्ती प्रक्षेपित होऊन पृथ्वीवरील साधक आणि दिवंगत साधक यांच्या समस्त पापांचे क्षालन श्रीविष्णूने केल्याचे जाणवले.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०१९, रात्री ११.३०)
|
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/513513.html