-
किरीट सोमय्या यांची पोलिसांच्या विरोधातच पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !
-
२८ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर येथे किरीट सोमय्या पुन्हा जाणार !
मुंबई – भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ३ दिवसांपूर्वी झालेल्या कोल्हापूर दौर्यात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांच्या विरोधातच २२ सप्टेंबर या दिवशी मुलुंड येथील नवघर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘मुंबई आणि मुलुंड पोलिसांनी येत्या २४ घंट्यांत माझी क्षमा मागावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करणारे किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्यावरून मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंत राजकीय नाट्य घडले होते. मुंबई पोलिसांनी सोमय्या यांना ‘सी.एस्.एम्.टी.’ रेल्वे स्थानकावर रोखण्याचा प्रयत्न केला होता, तसेच कोल्हापूर येथे जाण्यापूर्वीच सोमय्या यांना कराड येथे उतरण्याची पोलिसांनी विनंती केली होती.
‘अधिकृत तक्रार करण्यासाठी मी येथे आलो आहे. मी कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना पुन्हा पत्र लिहिले आहे. २८ आणि २९ सप्टेंबर या दिवशी मी पुन्हा कोल्हापूर येथे जाणार आहे. २८ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करीन’, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.