श्वासाला जोडून नामजप करतांना साधकाला ‘स्वतःचा स्थूल देह घरी नामजप करत असून सूक्ष्म देह नृसिंहवाडी येथील दत्तमंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहे’, असे दिसणे आणि त्रासदायक आवरण दूर होणे

श्री. संजय घाटगे

‘१०.२.२०२१ या दिवशी सकाळी ९.३० ते १० या वेळेत मी नामजप करत होतो. तेव्हा माझा श्वासाला जोडून नामजप चालू होऊन तो एका संथ लयीत होत होता. त्या वेळी मला जाणवले, ‘माझा स्थूल देह जयसिंगपूर येथील घरी नामजप करत आहे आणि त्याच वेळी माझा सूक्ष्म देह श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहे.’ मला हे दृश्य स्पष्टपणे घरी बसून दिसत होते. त्या वेळी मला आनंदाने भावाश्रू आले. नंतर थोड्या वेळाने मला ढेकरा येऊन ‘माझ्यावरील त्रासदायक आवरण दूर झाले’, असे मला जाणवले. ‘मला या स्थितीतून उठूच नये’, असे वाटत होते.

परात्पर गुरूंनी मला नामजपाविषयी ही श्रेष्ठतम अनुभूती दिली. त्याबद्दल मी श्री गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, कोल्हापूर. (१०.२.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक