पितृपंधरवड्याच्या कालावधीत पूर्वजांना गती  मिळण्याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

१. वर्ष २०१८ च्या पितृपंधरवड्यात मानसिक त्रासात वाढ होणे, देवाच्या कृपेने त्यावर मात करता येणे, दत्ताचा नामजप करतांना एका स्त्रीचा लिंगदेह दिसणे, तिला परात्पर गुरुदेवांना शरण जाऊन दत्ताचा नामजप करण्यास सांगणे

‘वर्ष २०१८ मध्ये पितृपंधरवडा चालू असतांना माझ्या मानसिक त्रासात वाढ झाल्याचे माझ्या लक्षात आले. देवानेच मला त्यावर मात करायला बळ दिले. अष्टमीच्या दिवशी मी ध्यानमंदिरात दत्तगुरूंचा नामजप करण्यासाठी बसले असतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘आश्रमाच्या प्रवेशद्वाराबाहेरील एका खांबाला टेकून एक स्त्री उभी आहे. ती माझ्याकडे नम्रतेने पहात आहे. तेव्हा माझा सूक्ष्म देह प्रवेशद्वाराकडे गेला. मी त्या स्त्रीला म्हणाले, ‘तू अजून इथेच आहेस का ? सर्व जण पुढे गेले. तू कशी काय मागे राहिलीस ? मागच्या वर्षी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया समजत नाही; म्हणून तूच रडत होतीस का ? इतरांना का विचारून घेतले नाहीस ? सर्व जण तुला साहाय्य करणार होते. आता तू स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया समजत नाही; म्हणून थांबू नकोस. तू या आश्रमात आली आहेस ना, तर दत्तस्वरूप असलेल्या परात्पर गुरुदेवांना शरण जा. त्यांची क्षमा माग. त्यांना सांग, ‘माझ्याकडून अनंत चुका झाल्या. मला क्षमा करा आणि मुक्त करा.’ ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अखंड कर. प्रार्थना कर. आता कशातच अडकू नकोस.’ नंतर त्या स्त्रीचा लिंगदेह दिसेनासा झाला. माझा सूक्ष्मदेह पुन्हा ध्यानमंदिरात आला.’

मी डोळे उघडल्यावर माझ्या लक्षात आले, ‘माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू होता. माझ्या दोन्ही हातांच्या मुद्राही तशाच होत्या.’ ‘तो स्त्रीचा लिंगदेह माझ्या चुलत काकूचा होता’, हे माझ्या लक्षात आले. ती जिवंतपणी पुष्कळ पान खात असे. दात दिसू नयेत; म्हणून ती नेहमी साडीचा पदर तोंडावर धरत असे. ती अशिक्षित होती. तिला स्वयंपाकही करता यायचा नाही.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला साधना समजली आणि त्यांच्यामुळेच ‘लिंगदेह कुणाचा आहे ?’, हे मला ओळखता आले. त्याबद्दल मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

२. वर्ष २०१९ च्या पितृपंधरवड्यात ‘पितरांना पुढची गती मिळावी’, यासाठी दत्तगुरूंना सतत प्रार्थना होणे

वर्ष २०१९ मध्ये पितृपंधरवडा चालू झाल्यानंतर मला कुणाचेही लिंगदेह दिसले नाहीत. मी मनापासून दत्तगुरूंना प्रार्थना केली, ‘हे दत्तगुरु, माझ्या सर्व पितरांना मुक्ती मिळू दे. त्यांच्याकडून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अखंड होऊ दे, तसेच ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनही मुक्त होऊ दे. त्यासाठी त्यांच्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रियाही आपणच करवून घ्या. त्यांना आता पृथ्वीवरील घर, गाडी, भूमी, धन-संपत्ती, नातेवाईक यांत अडकू देऊ नका.’ ‘देवच या प्रार्थना मला सुचवत आहे’, हे लक्षात आल्यावर माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.’

– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.९.२०१९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक