१ सप्टेंबर २०२१ च्या ‘लोकमत’ या वृत्तपत्रामध्ये ‘लेखणी ऐवजी बंदुका हाती आल्यावर देशाचा अफगाणिस्तान होतो’, असे विचार व्यक्त करण्यात आलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातील कार्यक्रमाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. वास्तविक क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘लेखण्या मोडून बंदुका हाती घ्या’, हे स्वातंत्र्यपूर्वकाळात इंग्रजांच्या जुलमी अत्याचारांविरोधात लढण्यासाठी भारतियांना केलेले आवाहन होते. त्याची तुलना ‘बंदुकधारी क्रूरकर्मा तालिबान्यांनी अफगाणिस्तान कह्यात घेऊन तेथील जनतेवर केलेल्या अत्याचारांशी करणे’, हे केव्हाही निषेधार्ह आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा घोर अवमानच आहे !
‘शौर्याला क्रौर्य ठरवले जाते’, ही दुर्दैवाची गोष्ट !
सत्य, न्याय आणि नीती या प्रधान पायावर भारतीय संस्कृती उभी आहे. ज्या वेळेला राक्षसी महत्त्वाकांक्षा बळावते, तेव्हा ती कार्य करते. ‘वरील वक्तव्य करणार्या लेखकाने या गोष्टीचा विचार केला आहे’, असे वाटत नाही.
कोणत्याही कृतीमागचे कारण आणि हेतू महत्त्वाचे असतात. उच्च, उदात्त हेतूने केलेली कृती वंदनीय असते. ‘जेव्हा दोन्ही हातांत शस्त्र आहे, तेव्हा ते केवळ क्रौर्यासाठीच वापरले जाते’, असे गृहीत धरता येत नाही. शस्त्रक्रिया करणार्या शल्यविशारदाच्या हातात असलेली सुरी आणि एखादा लुटारू, डाकू अशा दुष्ट प्रवृत्तीच्या हातात असलेली सुरी यांच्यात आकाश-पाताळाएवढे अंतर आहे !
सावरकर जेव्हा ‘लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या’, असे सांगतात, तेव्हा साहित्यिकांनी ‘मुठी वळल्या जातील’, अशा साहित्याची निर्मिती करावी’, हे अभिप्रेत आहे. आपल्या सैनिकांच्या हातात असलेल्या बंदुका राष्ट्ररक्षणार्थ आहेत. शत्रूचा निःपात केल्यावर त्यांच्या शौर्याचे कौतुक करून त्यांना सन्मानित केले जावे. ‘शौर्याला क्रौर्य ठरवले जाते’, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सशस्त्र क्रांतीकारक आणि राष्ट्रनिष्ठ हिंदु तरुणांना सैन्यात भरती होण्यास सावरकर यांनी सांगितले. ‘ब्रिटीश सरकारकडून संपूर्ण सैनिकी शिक्षण घ्या आणि अनुकूल परिस्थिती येताच ते शस्त्र ब्रिटिशांवर रोखून देश स्वतंत्र करा’, असे सांगितलेल्या सावरकर यांचे हे विचार क्षात्रतेज निर्माण करणारे आहेत. ‘अराजकता निर्माण करा’, असे सावरकर कधीही म्हणाले नाहीत.
मुंबईवर (२६/११ चे) आक्रमण झाले, त्या वेळी शस्त्रधारी सैनिकांमुळे आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, हे विसरून चालणार नाही. सावरकरांनीही राष्ट्ररक्षणार्थ सैनिकी शिक्षण घेऊन शस्त्रसज्ज होण्याचा सल्ला दिला. ‘हा सल्ला देतांना त्यांनी सत्य, ज्ञान आणि नीती यांची चौकट मोडली नाही’, याकडे लेखकाने लक्ष दिले नाही; म्हणून हा पत्रप्रपंच करावा लागत आहे !
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
– श्री. विद्याधर नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे