पुलाच्या खालील माती काढण्यासाठी २२ सप्टेंबरला आंदोलनाची चेतावणी
मालवण – शहरातील कोळंब खाडीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या कामासाठी ६ कोटी ३४ लाख ५४ सहस्र एवढा निधी खर्च करूनही पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पुलाचे काम करतांना ठेकेदाराने पुलाच्या खाली कोळंब खाडीच्या पात्रात टाकलेला मातीचा भराव अद्यापही काढलेला नाही. त्यामुळे मातीचा भराव काढण्यात यावा, या मागणीसाठी २२ सप्टेंबरला याच भरावाच्या ठिकाणी खाडीत उतरून आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी काँग्रेसचे मालवण येथील पदाधिकारी आणि येथील मासेमार यांनी दिली आहे.
मालवण येथील काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी १८ सप्टेंबरला कोळंब पुलाच्या खालील खाडीपात्रातील भरावाची पहाणी केली. या वेळी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, बबन कोयंडे, प्रथमेश करंगुटकर, महादेव पाटील, प्रथमेश राऊत, प्रमोद खडपकर आदी उपस्थित होते.
या वेळी संदेश कोयंडे म्हणाले की,
१. कोळंब पूल धोकादायक बनल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ९५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सिद्ध करण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात किती खर्च झाला, याची माहिती नसून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदाराला ६ कोटी ३४ लाख ५४ सहस्र रुपयांच्या देयकाची रक्कम देण्यात आली आहे. (कोयंडे यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून आरोपांमध्ये तथ्य असेल, तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)
२. पुलाचे काम मात्र निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पुलाच्या कामाच्या वेळी टाकण्यात आलेला मातीचा भराव ठेकेदाराने काढलेला नसतांना त्याला देयकाची रक्कम कशी देण्यात आली ?
३. भरावामुळे खाडीतील पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण झाल्याने पावसात पूरजन्य स्थिती निर्माण होऊन आडारी, देऊळवाडा, रेवतळे आदी भागांत पाणी भरत आहे. त्यामुळे हा भराव तात्काळ काढण्यात यावा.
४. खाडीत मातीचा भराव टाकल्याने मासे मिळण्याचे प्रमाण अल्प झाले आहे. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोतही घटला असून मासेमारांना आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.