श्री गणेशचतुर्थीच्या तिसर्‍या दिवशी बिअरची बाटली घेऊन धांगडधिंगा घालून श्री गणेशमूर्ती विसर्जन केल्यावरून धार्मिक भावना दुखावल्याची पोलिसात तक्रार

  • हिंदूंना आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी धर्मशिक्षण न दिल्यामुळेच ही अशी परिस्थिती उद्भवली आहे. – संपादक
  • मदरसे किंवा चर्च यांमधून त्या त्या धर्मांतील लोकांना धर्मशिक्षण मिळते; पण हिंदूंना असे धर्मशिक्षण कुठेही मिळत नाही; त्यामुळे हिंदूंना स्वतःच्या धर्माविषयी स्वाभिमान नसल्याने त्यांच्याकडून श्रद्धास्थानांचे विडंबन करणे, उत्सवात गैरप्रकार करणे, देवतांची विडंबनात्मक चित्रे काढणे, श्री गणेशाचे विडंबन करणारी चित्रे (कार्टून) काढणे यांसारखे गैरप्रकार केले जातात. – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, १९ सप्टेंबर (वार्ता.) – श्री गणेशचतुर्थीच्या काळात तिसर्‍या दिवशी काही कामगारांनी हातात बिअरची बाटली घेऊन धांगडधिंगा घालून श्री गणेशमूर्ती विसर्जन करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे पर्वरी येथील स्थानिक नेते अधिवक्ता शंकर फडते, प्रशांत शेट आणि दीपेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्वरीवासियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. (याविषयी पर्वरीवासियांचे अभिनंदन ! – संपादक)

प्राप्त माहितीनुसार पर्वरी येथे १२ सप्टेंबर या दिवशी (श्री गणेशचतुर्थीच्या तिसर्‍या दिवशी) महामार्गाचे काम करणार्‍या एका कंत्राटदाराच्या सुमारे १०० कामगारांनी रस्त्यावरून हातात बिअरची बाटली घेऊन धांगडधिंगा घालून श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक काढली आणि श्रींचे विसर्जन केले. (हा धांगडधिंगा चालू असतांना पोलीस काय करत होते ? संचारबंदी असतांना अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करून धांगडधिंगा चालू रहाणे म्हणजे कायदा अन् सुव्यवस्थेचे वाटोळेच म्हणायचे ! – संपादक) वास्तविक गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन दीड, ५, ७, ९, ११ आणि २१ यांदिवशी केले जाते. ३ दिवसांनी विसर्जन केले जात नाही. संबंधित कंत्राटदाराने कामगारांना मद्यप्राशन करण्यासाठी पैसे दिले. कामगारांनी गणेशोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी धांगडधिंगा घालून श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केले. परप्रांतीय कामगारांनी धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी जाणूनबुजून ही कृती केली असून या कामगारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. याविषयी अधिवक्ता शंकर फडते म्हणाले, ‘‘या कृतीमुळे केवळ धार्मिक भावनाच दुखावल्या असे नाही, तर गोवा आणि गोव्यातील संस्कृतीला अपकीर्त करून तिला न्यून लेखण्यात आले आहे.’’