क्रीडा क्षेत्रातील अपप्रकार आणि भारताचे अपयश !

‘नुकत्याच ऑलिंपिक स्पर्धा पार पडल्या. स्पर्धा पाहून ‘भारत सर्वच खेळांमध्ये किती मागे आहे’, हे सर्वांनाच लक्षात आले. भारतापेक्षा कितीतरी पटींनी लहान असणार्‍या देशांनी अनेक खेळांमध्ये विविध पदके मिळवली; पण भारताला तुलनेत अल्प पदके मिळाली. खरे पहाता भारताच्या कानाकोपर्‍यात विविध खेळांच्या संस्कृती अस्तित्वात आहेत. असे असतांनाही जागतिक स्तरावर मात्र भारत क्रीडा क्षेत्रात इतका मागे आहे, ही दुर्दैवाची गोष्टच म्हणावी लागेल. याविषयी मी आतापर्यंत अनुभवलेली सूत्रे आणि भारताच्या अपयशामागील लक्षात आलेली कारणमीमांसा येथे देत आहे.

श्री. ऋतुराज गडकरी

१. राज्यस्तरीय खेळण्यासाठी निवड केलेल्या मुलाला अन्य खेळाडूचे गुण दिले जाणे आणि लाच घेऊन जिंकवणे हेच खेळाडूंमधील खिलाडू वृत्तीच्या अभावाचे कारण असणे

एकदा विभागस्तरीय खेळांमध्ये माझी एका जिल्ह्यातून निवड झाली होती. मी जिल्ह्याच्या वतीने खेळलो; पण माझ्याऐवजी दुसर्‍याच एका मुलाला राज्यस्तरावर खेळण्यासाठी पाठवायचे ठरले होते. त्यामुळे मला मिळालेले गुण त्या मुलाला देण्यात आले आणि त्याची राज्यस्तरावर निवड झाली. असे झाल्याने मला राज्यस्तरावर खेळण्याची संधीच मिळाली नाही. यामध्ये संबंधित पदाधिकार्‍यांचा मनमानी कारभारच दिसून आला. असे बर्‍याच खेळाडूंच्या संदर्भात घडते. राज्यस्तरीय खेळणार्‍या मुलाचे संबंधित पदाधिकार्‍यांशी आर्थिक लागेबांधे असतात. अशा प्रकारे जर लाच घेऊन खेळाडूंना जिंकवले जात असेल, तर त्या खेळाडूंमध्ये खिलाडू वृती कधीतरी निर्माण होईल का ?

२. केवळ जिंकण्याच्या ईर्ष्येपोटी खेळाडूंची केली जाणारी पाठराखण आणि होणारे अपप्रकार !

२ अ. प्रशिक्षकांनी संयोजकांशी बोलून खेळाडूला हवे असलेले सिल्वर पदक मिळवून देणे : एका खेळाडूला राज्यस्तरीय ‘बॉक्िसंग’ स्पर्धेत ब्राँझ पदक मिळाले; पण त्याला सिल्वर पदक हवे होते. त्याच्या प्रशिक्षकाने खेळाच्या संयोजकांशी बोलून घेतले आणि त्याला सिल्वर पदक मिळवून दिले.

२ आ. खेळात सहभागी झालेल्यांना नव्हे, तर न सहभागी होणार्‍यांना पदके दिली जाणे : कानपूर (उत्तरप्रदेश) येथे इजिप्तच्या नॅशनल गेम स्पीड बॉल या खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. त्यात मी सहभाग घेतला होता. आम्हाला केवळ प्रशस्तीपत्रक देण्यात आले; पण कुठलेच पदक मिळाले नाही. उलट काही खेळाडूंनी खेळांमध्ये सहभाग न घेऊनही त्यांना प्रशस्तीपत्रक आणि पदक देण्यात आले.

२ इ. आयोजकांनी प्रशस्तीपत्रके खेळाडूंना न देता त्यांची विक्री करणे : एका ठिकाणी राज्यस्तरीय ‘बेसबॉल’ची स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात हा खेळ जास्त प्रचलित नसल्याने स्पर्धेत मोजकेच संघ सहभागी झाले होते. आयोजकांनी केवळ कागदोपत्रीच खेळाचे आयोजन केल्याचे दाखवले आणि जिंकणार्‍या स्पर्धकांना दिली जाणारी प्रशस्तीपत्रके विकून टाकली.

२ ई. देशासाठी खेळण्याची मानसिकता न ठेवता खेळाडूंनी केवळ स्वतःच्या लाभासाठी खेळांमध्ये सहभाग घेणे आणि प्रशस्तीपत्रके किंवा पदके विकण्याचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणात चालू असणे : एखादा खेळाडू चांगला असेल आणि त्याला अधिक पदके किंवा प्रशस्तीपत्रके मिळाली, तर त्याला अधिक शैक्षणिक गुण मिळतात. त्यामुळे काही विद्यार्थी अशी प्रशस्तीपत्रके विकत घेऊन शैक्षणिक गुण जास्त मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. ग्रामीण भागात ‘ॲथलेटिक्स’च्या खेळांमध्ये शाळा, महाविद्यालये येथून बरीच मुले सहभागी होतात; पण त्यांचा उद्देश ‘प्रशस्तीपत्रक मिळवून शैक्षणिक गुण कसे वाढतील’, असाच असतो. ‘खेळाच्या माध्यमातून पुढे जायचे आहे किंवा देशासाठी खेळायचे आहे’, अशी मानसिकता खेळाडू किंवा प्रशिक्षक यांची नसते. खेळांमधून मिळणारे प्रशस्तीपत्रक आणि पदक यांमुळे खेळाडूला आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी अशा सर्वच स्तरांवर पुष्कळ लाभ होतात. समाजामध्ये तर ही प्रशस्तीपत्रके आणि पदके विकण्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. यामध्ये शासकीय कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर लाच घेऊन हा व्यवसाय करतात.

२ उ. आर्थिक अडचणींमुळे खेळाडू क्रीडा क्षेत्रात पुढे जाऊ न शकणे : काही जण उत्तम खेळाडू असतात; पण आर्थिक अडचणींमुळे त्यांना बर्‍याच वेळा पुढच्या स्तरावर जाता येत नाही. प्रशिक्षणासाठी लागणारा पैसा, आवश्यक साधनसामुग्री, या सर्वांचा व्यय त्यांना परवडणारा नसतो. त्यामुळे एखादा खेळाडू खेळांमध्ये चांगले गुण मिळूनही पुढे जाऊ शकत नाही.

२ ऊ. राज्यस्तरीय खेळात सर्वांचे लक्ष मेजवानी आणि मद्य यांकडेच असणे : एकदा राज्यस्तरावर एका खेळाचे आयोजन करण्यात आले होते; पण त्या खेळाचे आयोजक, प्रशिक्षक, अध्यक्ष, अधिकारी हे सर्वच जण मेजवान्या (पार्ट्या) करणे, मद्य पिणे यांत गुंग होते. त्यामुळे खेळ खेळणे, तो जिंकणे हे तर दूरच राहिले. एखादी स्पर्धा आयोजित करण्याचा उद्देश केवळ पैसे मिळवणे आणि मौजमजा करणे इतकाच मर्यादित आहे. अशा अनेक कारणांमुळे देशाची जागतिक स्तरावरील खेळाची प्रतिमा वाईट ठरते.

२ ए. पदाधिकार्‍यांनी खेळाडूंना नोकराप्रमाणे वागवणे आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी करणे : एखाद्या खेळाडूला खेळामध्ये पुढे जायचे असेल, तर संबंधित पदाधिकारी त्याला अक्षरशः नोकराप्रमाणे वागवतात. ते स्वतःची वैयक्तिक कामेही त्या खेळाडूंकडून करवून घेतात, तसेच त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात. हे सर्व केल्यासच तो खेळाडू पुढे जाऊ शकतो. याचा अनुभव मला बर्‍याच ठिकाणी आला आहे.

३. भारताने अन्य देशांकडून बोध घ्यावा !

अन्य देशांमध्ये मुलांना त्यांच्या लहान वयापासूनच खेळांचे परिपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. ‘ते देशासाठी खेळून देशाचा नावलौकिक वाढवतील’, या उद्देशानेच त्यांना घडवले जाते. खेदजनक गोष्ट म्हणजे भारतात तसे होत नाही. भारतात क्रीडा क्षेत्राचे संपूर्ण बाजारीकरण झाले आहे. केवळ पैसे कमावणे इतकाच हेतू यात दिसून येतो.

४. भ्रष्टाचारविरहीत उत्तम प्रशासन असल्यासच भारत क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी बजावू शकेल !

भारताला क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती किंवा कामगिरी करायची असेल, तर खेळाचे प्रशासन उत्तम असायला हवे. तळागाळातील खेळाडूंना जागतिक स्तरावर खेळण्याची संधी निर्माण करून दिली पाहिजे. खेळांच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’

– श्री. ऋतुराज गडकरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.